खलील गिरकर : लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांवर नाराज असलेले शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे़.
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शेख यांनी पक्षात प्रवेश केला. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात शक्तीप्रदर्शन करून शेख जाहीर पक्षप्रवेश करतील. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रेम दिले मात्र अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी समाजाला न्याय दिल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली. शिवसेनेने आपल्याला उपनेते पद दिले.मात्र विधानपरिषदेचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात संधी दिली नाही. अल्पसंख्याक आयोगामध्ये देखील आपल्याला संधी डावलण्यात आली. उपाध्यक्ष पदी अभ्यंकर यांची निवड केली.
वाहतूक विभागाची पूर्ण जबाबदारी देण्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कामाचे मुल्यांकन करून आयोगाचे अध्यक्ष पद देऊन अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्याची संधी दिली व अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे शेख म्हणाले.
शिवसेनेत आपल्याला दुर्लक्षित करण्याचा व अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना डावलण्याचा प्रयत्न झाला, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबध्द राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेख यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत अन्याय होतो व वेगळी वागणूक दिली जाते, असा आरोप थेट पक्षाच्या व्यासपीठावरून करून खळबळ माजवली होती. त्यानंतर त्यांना पक्षातर्फे चुचकारण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेख यांच्या नाराजीची दखल घेत त्यांना भाजपकडे वळवण्यात यश मिळवले.
रमजान महिन्यात माहीम दर्गाहचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या सेहरी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत शेख यांची सलगी दिसल्याने मातोश्रीवरून त्यांना जाब विचारण्यात आला होता. मात्र विविध आश्वासनांची पूर्तता करण्यात सेना नेतृत्वाला अपयश आल्याने शेख यांनी भाजपचा रस्त्यावर चालणे अधिक श्रेयस्कर समजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रदेश उपाध्यक्ष व वाहतूक सेनेचे प्रमुख असताना मनसेचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुस्लिम खाटीक समाजाचे अध्यक्ष असलेल्या शेख यांची वाहतूक क्षेत्रात चांगली ताकद असल्याने त्यांच्या जाण्याने सेनेला काहीसा फटका बसण्याची व भाजपला लाभ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
शिवसेनेचे नेते फोडून त्यांना एखादे महत्वाचे पद देण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भाजपाच्या कोट्यातून रेल्वेमंत्रीपद देऊन त्यांचाही असाच भाजपा प्रवेश करण्यात आला होता. यावेळीही शिवसेनेने प्रभू यांना डावलले होते. मात्र, प्रभू यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला कोणताही फटका बसला नसला तरीही शेख यांच्यामुळे अल्पसंख्यांक समाज काहीसा दूर जाण्याची शक्यता आहे.