मराठा समाजाचे अर्धा डझन मुख्यमंत्री झाले; मुनगंटीवारांनी ६ नावंही सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:42 PM2023-11-08T19:42:38+5:302023-11-08T19:45:46+5:30
ओबीसी नेत्यांनीच मराठा समाजाचं नुकसान केल्याचा आरोप केला जात आहे?, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता
मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम असून आता ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसींचं आरक्षण संपून जाईल असे त्यांनी म्हटले. दरम्यान, भुजबळांच्या विधानावर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही पलटवार केला. आम्ही ओबीसीच आहोत, आम्ही कुणबीच आहोत, त्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र आम्हाला मिळालंच पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. ओबीसी व मराठा वादावर बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधला.
ओबीसी नेत्यांनीच मराठा समाजाचं नुकसान केल्याचा आरोप केला जात आहे?, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादीच सांगतिली. तसेच, १ मे १९६० पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे अर्धा डझन मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सर्वजण मराठा मुख्यमंत्री होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांनीच दिलं, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. यावेळी, मुनगंटीवारांनी नाव घेऊनच मराठा नेत्यांवर निशाणा साधला.
मराठा समाजातील या नेत्यांनी सत्ता उपभोगली पण आरक्षण मिळवून दिलं नाही का? असा प्रश्न विचारताच, या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज आहे का, असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी केला. तसेच, सुर्याकडे पाहून हा सूर्य आहे का, आणि चंद्राकडे पाहून हा चंद्र आहे का?, असा प्रश्न विचारायचा नसतो, असे म्हणत मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षणावरुन मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं.
दरम्यान, ज्यांच्याकडे कुणबी म्हणून नोंदी आहेत, ते अगोदरच ओबीसीमध्ये आहेत. त्यामुळे, आता ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, अशा मराठा समाजातील नागरिकांना आरक्षण देण्याचा प्रश्न आहे, त्यावर चर्चा होत आहे, असेही मुनगंटीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना स्पष्ट केले.