Join us

सावधान! राज्यात सव्वा लाख कॅन्सरग्रस्त, विळखा वाढतोय; आधुनिक जीवनशैलीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 8:23 AM

संपूर्ण जगात कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षात देशात १४ लाख ६१ हजार रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

मुंबई :  संपूर्ण जगात कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षात देशात १४ लाख ६१ हजार रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १ लाख २१ हजार ७१७ रुग्णांचा समावेश आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, आधुनिक जीवनशैलीचा अवलंब केल्याने कॅन्सर आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ६५ टक्के कॅन्सर हे प्रतिबंधात्मक आहेत. मात्र, चुकीच्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. 

कॅन्सरच्या रुग्णांत ज्यामध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये सर्वसाधारण स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.  ताणतणाव, खाण्यापिण्यासंबंधीच्या सवयी, दारू आणि तंबाखूचे सेवन ही काही कॅन्सर होण्याची मुख्य कारणे आहेत. तरुण पिढी सध्या व्यसनाधीन झाली आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहायचे असले तर या सर्व गोष्टीपासून लांब राहणे गरजेचे आहे.    

मुंबई येथील टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ऍक्टरेक संस्थेत रुग्णाच्या उपचारासाठी बेड वाढविण्याचे काम सुरू आहे. रुग्णाची एकंदरच संख्या वाढल्याने या आजाराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहे. शासकीय संस्थांसोबत खासगी रुग्णालयातही या आजारासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत.

शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढले आहे. नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये मोठा फरक पडला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे या आजाराचे प्रमाण अधिक दिसत आहे. या आजाराचे प्रमाण कमी करायचे असेल तर जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे.  जगभरात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ६५ टक्के कॅन्सर हे प्रतिबंधात्मक आहे. नागरिकांनी जंकफूड बंद करून नियमित घरचे जेवण करून व्यायाम करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.   

- डॉ. श्रीपाद बाणावली, संचालक (शैक्षणिक), टाटा मेमोरियल हॉस्पिटल

  उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा समावेश 

 नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातही कॅन्सरचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.

 वैद्यकीय विश्वात झालेल्या प्रगतीमुळे कॅन्सर निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत कॅन्सर आजारांवर उपचार देणाऱ्या ८ ते १० मोठी रुग्णालये देशात सुरू झाली आहे.

 राज्यातही मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी या आजारासाठी लागणाऱ्या पायाभूत वाढविण्याचे काम करण्यात आले आहे.

 महिलांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयास लिनिर अक्सेलेटरसाठी मोठा निधी शासनातर्फे देण्यात आला आहे.

राज्यातील वर्षनिहाय कॅन्सरचे रुग्ण

२०१८   १,१०, ६९६

२१०९   १,१३, ३७४

२०२०   १,१६, १२१

२०२१   १,१८, ९०६

२०२२   १,२१, ७१७

टॅग्स :हॉस्पिटल