मुंबईतील निम्म्या इमारती असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 04:36 AM2018-12-21T04:36:21+5:302018-12-21T04:36:52+5:30

अग्निशमन दलाची पाहणी : कारवाईनंतर बहुतांश ठिकाणी केले गेले आवश्यक बदल

 Half of the buildings in Mumbai are unsafe | मुंबईतील निम्म्या इमारती असुरक्षित

मुंबईतील निम्म्या इमारती असुरक्षित

मुंबई : कामगार रुग्णालयातील भीषण आगीच्या दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच मुंबईत गेल्या २४ तासांत तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या वाढत्या घटनांनी मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबई अग्निशमन दलाने २०१४ ते २०१८ या काळात केलेल्या पाहणीत ५० टक्के इमारती सुरक्षेचे नियम टाळून दुर्घटनेलाच आमंत्रण देत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आणली आहे. कारवाईचा दंडुका दाखविल्यानंतर यापैकी बहुतांशी इमारतींमध्ये आवश्यक बदल करण्यात आले.

टोलेजंग इमारतींच्या स्पर्धेत मुंबईतील इमारतींची उंची ८८ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. वरळी येथील पॅलॅसिस रॉयल ही इमारत तब्बल ३२० मीटर उंच आहे, अशा इमारतींमध्ये वरच्या मजल्यावर आग लागल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना तिथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अग्निशमन दलाकडे असलेल्या सर्वात उंच म्हणजे ९० मीटरपर्यंत असलेल्या स्नॉर्केल (शिड्या) केवळ २८ व्या मजल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्याहून अधिक मजल्यावर लागलेल्या आगीची तीव्रता जवानांना जाणून घेता येत नाही. परिणामी मदत पोहोचेपर्यंत आग वाढून जीवितहानीचा धोका वाढतो.
मुंबईतील अनेक इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटनेवेळी तेथील अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार वर्षांत दर महिन्याला सरासरी १२० इमारतींची पाहणी करण्यात आली आहे.५० टक्के इमारतींमध्ये आग प्रतिबंधक नियम पाळण्यात आले नाहीत, असे दिसून आले होते.

इमारतीमध्ये असावी ही सुरक्षा

अग्निरोधक यंत्र, स्मोक डिटेक्टर्स, पाण्याचे पंप, पाण्याचा शिडकावा (स्प्रिंकलर्स) आपत्कालीन वीज व्यवस्था, आगीच्या दुर्घटनेत इमारतीबाहेर पडण्याचा आपत्कालीन मार्ग असणे आवश्यक आहे.

हे टाळावे
च्अनेक वेळा आगीच्या दुर्घटनेवेळी लिफ्टमधून इमारतीखाली येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा बळी गेल्याचे दिसून आले आहे. मात्र लिफ्ट बंद पडण्याचा धोका असल्याने जिन्याचा वापर करणे आवश्यक आहे.
च्जिने आणि प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नये, दुर्घटनेच्या वेळी जिन्यावर अडथळे असल्यास नागरिकांना इमारतीबाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊन धोका अधिक वाढतो.
च्जिन्याकडे जाणारा दरवाजा उघडा ठेवू नये, आगीच्या दुर्घटनेत धूर आणि उष्णता जिन्यापर्यंत पोहोचल्यास इमारतीतील रहिवाशांना बाहेर पडणे शक्य होत नाही.

ड्रोनची मागणी
अग्निशमन दलाच्या शिड्या केवळ २८ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यावरील मजल्यावर मदतकार्यासाठी आगीचा अंदाज, घटनेची तीव्रता व स्वरूप कळणे आवश्यक आहे. अशा वेळी ड्रोन कॅमेºयाद्वारे स्थितीचा आढावा घेत कमी वेळेत उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. यासाठी ड्रोन कॅमेरा घेण्याची मागणी पालिका महासभेपुढे प्रलंबित आहे.
 

Web Title:  Half of the buildings in Mumbai are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.