Join us

कारशेडच्या स्थगितीमुळे रोज अडीच कोटींचा तोटा; समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:47 AM

मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते, मात्र ही जागा हरित पट्ट्यात येत असल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता

मुंबई : मेट्रो-३ मार्गिकेच्या आरेमधील कारशेडला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती; मात्र ही कारशेड कुठे होईल याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) दिवसामागे सुमारे अडीच कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या आरेतील कारशेडसाठी झाडे तोडावी लागणार होती. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी आरेतील कारशेडला स्थगिती दिली होती. या स्थगितीला आता शंभर दिवस उलटले आहेत. कारशेडशिवाय मेट्रो-३ मार्गिकेच्या कामालाही विलंब होणार आहे. ज्या वेळी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला त्या वेळी त्याचा खर्च २३ हजार कोटी रुपये इतका होता. आता तो वाढून ३२ हजार कोटी रुपये इतका झाला आहे.

मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते, मात्र ही जागा हरित पट्ट्यात येत असल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. नंतर वित्त विभागाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समितीही नेमली होती. ही समिती कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणार होती. या समितीने तयार केलेल्या अहवालानुसार, कारशेड आरे कॉलनीच्या बाहेर हलविणे अवघड असल्याचे नमूद केले आहे. आरेमध्ये आधीच वनजमिनीचे कारशेडच्या कामानुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जर हे शेड दुसऱ्या ठिकाणी करायचे झाल्यास प्रकल्पाला आणखी विलंब लागू शकतो.

टॅग्स :मेट्रोआरे