मुंबई : म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन ८ दिवस उलटूनही गेले असले तरी त्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या ९२ हजारांवर नागरिकांना आपल्या रकमेसाठी अद्याप किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांचा ‘रिफंड’ बॅँक खात्यावर आॅनलाइन पद्धतीने केला जाणार असला तरी वाढीव व्याज मिळण्यासाठी म्हाडा जादा दिवसांचा अवधी घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.रकमेच्या परतफेडीबद्दल प्रशासनाकडून कोणतीच सूचना न आल्याने अर्जदार मात्र हवालदिल झाले असून त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे तब्बल २२७ कोटी १९ लाख रुपये परत करावयाचे आहेत. तर विजेत्यांचे ६ कोटी ८० लाख म्हाडाकडे राहणार आहेत. मुंबई मंडळाकडून गेल्या वर्षी ३१ मे रोजी झालेल्या सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांचे डिपॉझिट परत करण्यामध्ये म्हाडा व अॅक्सिस बॅँकेने मोठा घोळ केला होता, त्यामुळे नागरिकांना त्याचे पैसे परत मिळण्यास महिना, दीड महिन्याचा अवधी लागला. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी विशेष खबरदारी घेतली असली तरी रक्कम त्यांच्या बॅँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत ठोस कालावधी जाहीर केलेला नाही. म्हाडाने मुंबई व विरार-बोळिंज आणि वेंगुर्ल्यामध्ये बांधलेल्या २६४१ सदनिकांची गेल्या बुधवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अयशस्वी ठरलेले अनामत रक्कम त्वरित मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लॉटरीसाठी इच्छुक असलेल्या ९३ हजार १३० जणांकडून सुमारे २३४ कोटींवर अनामत रक्कम मिळाली आहे. त्यापैकी विजेत्या ठरलेल्यांची रक्कम जवळपास ६ कोटी ८० लाख ८२,५०० आहे. ती वगळता २२७ कोटी १९ लाख १७,५०० रुपये संबंधित अर्जदारांच्या बॅँक खात्यावर परत करावयाचे आहेत. हा व्यवहार अॅक्सिस बॅँकेच्या मार्फत करण्यात आला असून २६ जूनला सोडतीनंतर बॅँकेला विजेत्यांची नावे कळविण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
म्हाडाच्या ९२ हजार अर्जदारांना ‘रिफंड’साठी आठवडाभर प्रतीक्षा
By admin | Published: July 04, 2014 3:13 AM