Join us

फलाटापासून अर्धी लोकल गेली पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:33 AM

मध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नेरुळ स्थानकातील घटना

मुंबई : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय बुधवारी प्रवाशांना आला. पहाटे साडेसहाच्या सुमारास हार्बर मार्गावरील नेरुळ स्थानकातील फलाट सोडून लोकल पुढे गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल सहा बोगी फलाटापासून दूर पुढे गेल्या होत्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत मध्य रेल्वेचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी युनियनच्या बैठकीत असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यात नकार दिला.सोमवारी बेलापूरला जाणारी लोकल वांद्रे स्थानकात गेली होती. मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा एकदा अशीच काहीशी घटना घडली. बुधवारी वाशी-पनवेल लोकल सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी नेरुळ स्थानकात पोहोचली. मात्र, ही लोकल फलाटावर न थांबता पुढे जाऊन थांबली. फलाटांपासून तब्बल ६ ते सात बोगी पुढे जाऊन उभी राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. फलाटावर लोकल न थांबल्याने काही प्रवाशांनी ‘ब्रेक फेल झाला’ अशीदेखील अफवा पसरविली. मात्र, फलाट सोडून लोकल पुढे उभी राहिल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. फलाट सोडून पुढे गेलेल्या बोगीतून प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारत फलाट गाठले.फलाट सोडून लोकल पुढे गेली, तरी सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. तथापि, यामुळे हार्बर मार्गावरील अन्य लोकल फेऱ्यांवरदेखील परिणाम झाला. यामुळे हार्बर मार्गावरील बहुतांशी लोकल फेºया विलंबाने धावत होत्या. सोमवारी बेलापूरला जाणारी लोकल वांद्रे स्थानकात गेली होती. त्यापूर्वीही मध्य रेल्वेच्या मोटरमनने सिग्नल ओलांडल्याचा प्रकार घडला होता.

टॅग्स :रेल्वे