फेरीवाला शुल्कात होणार दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:55 AM2019-02-24T00:55:58+5:302019-02-24T00:56:01+5:30
महापालिकेचा निर्णय : स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आकारणी
मुंबई : फेरिवाला धोरणानुसार मुंबईत फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपविधी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर आता अधिकृत फेरिवाल्यांचे मासिक शुल्कही निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार दुप्पट शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित आकारणी सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेने सन २०१४ मध्ये मुंबईतील सर्व फेरिवाल्यांकडून अर्ज मागविले होते. या अर्जांची पडताळणी करून परिमंडळ फेरिवाला समिती आणि शहर नियोजन फेरिवाला समितीसमोर मांडण्यात येत आहे. फेरिवाल्यांचे शुल्क निश्चित करण्यात येत आहे. पदपथ विक्रेता उपविधी तयार केल्यानंतर आता फेरिवाल्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
यामध्ये सध्या आकारण्यात येणाºया शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तर अतिरिक्त शुल्कातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अ, ब, क या तीन प्रवर्गात अनुक्रमे २५, १५ आणि १२ रुपये याप्रकारे मासिक शुल्क आकारले जाते होते. यापुढे अ आणि ब असे दोन प्रवर्ग बनवून त्याप्रमाणे अनुक्रमे ५०, २५ रुपये असे शुल्क आकारले जाणार आहे.
असे आहे शुल्क
च्ए,बी, सी, डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम , पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, एन, टी या विभागांमध्ये फिरते फेरिवाले मासिक शुल्क ५० रुपये, स्थिर हातगाडी मासिक १८० ते २७० रुपये, फिरती हातगाडी दुचाकी व तीन चाकी मासिक ९० व १४० रुपये असणार आहे.
च्ई, एच पूर्व, आर उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस विभागात फिरते फेरिवाले मासिक - २५ रुपये, स्थिर हातगाडी मासिक १०५ व १६० रुपये, फिरती हातगाडी दुचाकी व तीन चाकी मासिक ५५ व ८० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.