हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरला कारावास

By Admin | Published: May 26, 2016 01:16 AM2016-05-26T01:16:26+5:302016-05-26T01:16:26+5:30

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली. तब्बल १६ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेटे

Half-hearted doctor imprisoned | हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरला कारावास

हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरला कारावास

googlenewsNext

मुंबई : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली. तब्बल १६ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेटे कुटुंबीयांना न्याय मिळाला. वांद्र्याच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉ. शरद गोगटे यांना दोषी ठरवत तीन महिन्यांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. त्यातील २५ हजार रुपये शेटे कुटुंबीयांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
दुसऱ्या रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि डॉक्टरांनीही याकडे गांभीर्याने पाहावे म्हणून शेटे यांनी जनजागृती करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती.
मृत पावलेल्या सुनीता शेटे यांना २००० साली दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली होती. प्रसूतीसाठी त्यांनी माहीमच्या सूरलता प्रसूतिगृहात नाव नोंदवले. १ आॅक्टोबर ही त्यांना प्रसूतीची तारीख देण्यात आली होती. पण, त्यांना मुदतीआधीच म्हणजे २१ सप्टेंबर २००० रोजी पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. येथे डॉ. शरद गोगटे यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुसऱ्या दिवशी सकाळी २२ सप्टेंबरला सुनीता यांचे पती सरशीज सुनीताला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी तिची प्रकृती उत्तम होती. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता ते रुग्णालयात सुनीताला भेटायला गेले. त्यावेळी सुनीताला आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी सुनीताला सलाइन लावण्यात आले. त्यावेळी तिच्याबरोबर एकच आया होती, असे सरशीज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनीताला अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्याच इमारतीत राहणाऱ्या डॉ. गोगटे यांना सरशीज हे बोलवायला गेले होते. पण, पाच मिनिटांत येतो म्हणून सांगणाऱ्या डॉ. गोगटे यांनी आॅपरेशन थिएटरमध्ये येण्यास तब्बल तासभर खर्ची घातला. तोपर्यंत सुनीता बेशुद्धच होत्या. डॉ. गोगटे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेआठच्या सुमारास सुनीता यांना मृत घोषित केले.
सुनीता यांच्या निधनानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर सलग १६ वर्षे सतत याचा पाठपुरावा केल्यानंतर वांद्रे न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस.एम. चंदगडे यांनी डॉ. गोगटे यांना तीन महिने सक्त मजुरी आणि ५० हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. तर याच प्रकरणात राज्य ग्राहक न्यायालयानेही शेटे यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश डॉ. गोगटे व सुरलता रुग्णालयाला दिला होता. मात्र या आदेशाला केंद्रीय ग्राहक न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे. (प्रतिनिधी)

न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही शेटे कुटुंबीय करत असल्याचे पीडितेचे भाऊ नंदकुमार काटकर यांनी सांगितले. काटकर म्हणाले की, वयाची सत्तरी गाठल्याने गोगटे यांना न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक शिक्षा सुनावली. मात्र वैद्यकीय प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हवी. जेणेकरून अशाप्रकारे हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना सूट मिळणार नाही.

Web Title: Half-hearted doctor imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.