मुंबई- काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरुन बोचरी टीकाही केली.'आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी
उद्धव ठाकरे यांच्या हिंगोलीतील सभेवर आता भाजपसह शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर टीका केली.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, एक शुभेच्छा, अभिनंदन देखील केलं नाही? पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर उद्धवजींची प्रतिक्रिया आली. मग उद्धवजी, तुमच्या प्रतिक्रियांची स्क्रिप्ट अन्य कुठे मंजूर होते का? त्यानंतर आपण बोलता का? असा आज जनतेच्या मनातला प्रश्न आहे आणि मग चंद्रावरच्या घराची गोष्ट करायची असेल तर, तुमच्यावर असाही मुंबईकरांचा, देशवासियांचा विश्वास नाही, त्यामुळे उद्धवजींनी उपहासात्मक केलेले विधान हे सहजतेने घेऊ नका, असे आम्ही नम्रपणे सांगतो.
'मला तर आता अशी शंका आहे की, भ्रष्टाचाराची पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री एक झालं, मातोश्री दोन झालं, आता उरलेल्या पैश्यात चंद्रावर मातोश्री तीनचा विचार तर उद्धवजींच्या मनात नाही ना? त्याकरिता उद्धवजी तुम्ही उपाहासाने बोलताय का? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे, असा खोचक सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला.
हिंगोलीतील सभेवर बोलताना आमदार शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे सार्वजनिक रडण्याचा, रुदालीचा कार्यक्रम असतो. केवळ दुसऱ्याच्या घरात डोकावणे, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर चर्चा करणे, एवढाच कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचा कार्यक्रम, धोरण नसलेल्या पक्षाचे नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष होय.पातळी सोडून बोलण्याची भाजपची पद्धती नाही. त्यामुळे नम्रपणे आमचे सांगणे आहे की, मर्यादा ठेवा. मर्यादेत रहा, भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकता हा दुबळेपणा नव्हे. तुमची आज अशी स्थिती झाली आहे की, ज्या वेळेला तुम्ही बाहेर निघतात त्यावेळेला तुमचा पक्ष कुठला? मागचे नगरसेवक निघून गेले, मागे पक्षात आमदार बघितले तर ते पळून गेले, मागचे खासदार सोडून गेले आणि म्हणून आम्हाला म्हणायचं ते आम्ही म्हणणार नाही, पण तुमची अवस्था शोले मधल्या "असरानी" सारखी झालेली आहे. आम्हालाही तुम्हाला घरबशा म्हणायचं नाही, घर कोंबडा म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही.. आणि म्हणणारही नाही... अहंकारामुळे तुमच्या पक्षातील तुमचे स्थान काय याचं जनतेत मूल्यमापन काय झालं आहे याचा विचारही तुम्ही करायला पाहिजे, असा टोलाही शेलार यांनी लगावला.
इंडिया म्हणजे परिवार वाचवण्यासाठी धडपड
इंडियाची बैठक म्हणजे पारिवारिक कार्यक्रमाला जास्त प्राधान्य, देशहिताला नाही. जे होणारच नाही पण कल्पनाच जर करायची असेल आणि रंगवायचं जर असेल, तर हे कधी चुकून सत्तेत आले तर पक्ष, लोकसभा, राज्यसभा घेऊन जातील आणि परिवाराबरोबर पर्यटन करत बसतील. विदेशात जातील, त्यामुळे ही उडणारी फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांच्या जीवावर देशहित साध्य होणार नाही, हे देश आणि जनता चांगलेच जाणते. ही सगळी धडपड देशासाठी नसून आपले परिवारवादी पक्ष वाचवण्यासाठी आहे.
कधी एसी रूम बाहेर आला नाहीत
तुम्ही घरी बसला होतात..काय केले? सांगा ना कुठे नांगर घेऊन गेलात? कुठे बियाणे घेऊन गेलात?कुठे शेतकऱ्याला मदतीला गेलात? कुठे पाणी टंचाईला मदत केलीत? कुठे शेतकऱ्यांच्या डेलिकेशनला भेटलात? तुम्ही घरामध्ये बसायचे, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. पण राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य हितासाठी हजारो कोटींचा उद्योग आणण्यासाठी गेले तर अडचण काय? राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईवासियांना वडाळापर्यंतची अंडरग्राउंड मेट्रो ११ याची मदत घेऊन आले, तर तुमच्या पोटात का दुखतयं? उद्धवजी..! तुम्हाला आमचा सवाल आहे की, मुंबईसाठी टोकियोसारखा पूरमुक्तीचा आराखडा बनवण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या हिताची घेतली तर तुम्हाला का त्रास होतोय ?, असा सवालही आमदार शेलार यांनी केला.