ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मराठी राजभाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मोगॅम्बो असा उल्लेख करत केलेली टीका भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. या टीकेनंतर भाजपा आमदार आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना आम्हीही तुमचा उल्लेख शोलेतील असरानी म्हणून करू शकतो, असा इशारा दिला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरेंची मनस्थिती आम्ही समजू शकतो. त्यांचा थयथयाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य सगळं आम्ही समजू शकतो. राजकारणामध्ये टीकेला भाजपा काल घाबरला नव्हता, आज घाबरत नाही आणि उद्याही घाबरणार नाही. पण राजकारणाचे काही संकेत असतात. त्या संकेतांप्रमाणे टीका करतानादेखील संयम आणि मर्यादा यांची अपेक्षा असते.
ते पुढे म्हणाले की, संयम आणि मर्यादा पाळायच्या नसतील आणि आमचं श्रद्धास्थान, अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर वारंवार अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करत असतील, तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. मी तर कोकणी माणूस आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं. आमच्याकडे त्याहूनही इरसाल शब्द आहेत. आम्ही तुमचीही त्या ठिकाणी मांडणी अशी करू शकतो की तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील असरानीसारखे झाला आहात. शोलेतील असरानीप्रमाणे आधे इधर आधे उधर मागे कुणी आहे ते दिसत नाही आहे. आज हिंदी चित्रपटातील असरानी म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही अशी आम्ही मांडणी करू शकतो, असा इशारा आशीष शेलार यांनी दिला.
बाकी काही चोरता येते, चोरीला जाऊ शकते. मात्र, संस्कार चोरता येत नाहीत. आणि ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांनाच चोरीचा माल लागतो. शिवसेना म्हणजे केवळ नाव आणि चिन्ह नाही, ती हजारोंच्या मनात भिनलेली आहे. मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.