लुटारूंसोबत अर्ध्या तासाचे थरारनाट्य, मुलीसह स्वत:ला बंद केले शौचालयात
By मनीषा म्हात्रे | Published: March 28, 2018 01:07 AM2018-03-28T01:07:47+5:302018-03-28T01:07:47+5:30
दुपारच्या सुमारास ३ वर्षाच्या मुलीसोबत खेळत असाताना घराची बेल वाजली
मुंबई : दुपारच्या सुमारास ३ वर्षाच्या मुलीसोबत खेळत असाताना घराची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला, तोच दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांनी पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी ती स्वयंपाक घरात जाताच दोन लुटारुंनी घरात प्रवेश केला. महिलेचे तोंड रुमालाने दाबले. आणि स्वयंपाक घरातील सुरी मुलीच्या गळ्यावर ठेवत दागिन्यांची मागणी सुरु केली. तिने मुलीच्या बचावासाठी कपाटाकडे इशारा केला. दोघेही तेथे वळताच तिने चिमुरडीसह स्वत:ला शौचालयात कोंडून घेतले. तब्बल अर्धा तासाने लुटारु बाहेरचा दरवाजा बंद करुन घराबाहेर पडले. एखाद्या हिंदी चित्रपटातील दृष्याप्रमाणे वाटणारी घटना सोमवारी काळाचौकी परिसरात घडली. यामध्ये त्यांच्या घरातून दिड लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
शिवडीच्या स्वान मिल म्हाडा संकुल इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आजमीराबीबी आलमगीर खान (२३) पती आणि ३ वर्षाच्या मुलीसोबत राहतात. पती झवेरी बाजारात सोन्याचे कारागिर म्हणून काम करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे ३ वाजता पतीने घर सोडले. त्यावेळेस खान ही मुलीसोबत एकट्याच होत्या. साडे तीनच्या सुमारास घराची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. तोच दोन अनोळखी तरूण घराबाहेर उभे होते. त्यातील एकाने, ’भाभी पाणी दो’ असे म्हंटले. म्हणून त्यांना तेथेच थांबवून ती पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. तिच्या पाठोपाठ दोघेही घरात शिरले. त्यातील एकाने दरवाजा बंद केला. आणि रुमालाने खान हिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
पैशांसाठी त्यांनी तिला मारहाण सुरु केली. तिचे केस ओढत दागिने कुठे ठेवले याबाबत विचारणा केली. लुटारुने स्वयंपाक घरातील सुरी मुलगी मरियमच्या गळ्याभोवती ठेवली.’आवाज मत करो,सोना मेरे पास दो, नही तो बच्ची को मार दूंगाची धमकी दिली. त्याच्या साथीदाराने खानच्या अंगावरील दागिने हिसकावले. मुलीच्या बचावासाठी खानने बेडरुममधील कपाटाकडे इशारा केला. दोघेही लुटारु कपाटाकडे जाणार तोच खानने मुलीला घेऊन स्वत:ला शौचालयात कोंडले. इथे लुटारुंकडून दरवाजावर लाथा मारणे सुरु होते. मुलीची किंकाळी त्यात दरवाजाबाहेर हातात चाकू घेऊन असलेल्या लुटारुंमुळे तिने देवाकडे धावा सुरु केल्या.
तब्बल अर्धा तासाने बाहेरुन काहीच आवाज येत नसल्याने तिने बाथरुमचा दरवाजा उघडला. तेव्हा लुटारु बाहेरचा मुख्य दरवाजा बंद करुन निघून गेल्याचे लक्षात आले. तिने दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. इथे पतीला फोन करत असताना, त्याच्याशी संपर्क झाला नाही. अखेर तिने मोबाईलवरुन मैत्रीणीला घडलेला घटनाक्रम सांगून बोलावून घेतले. बराच वेळानंतर पतीचा फोन आल्यानंतर त्याला घडलेला घटनाक्रम सांगितला. तो घरी येताच घरातील सामानाची झडती घेतली. तेव्हा घरातून दिड लाखांचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.
लुटारुंचा शोध सुरु
खानने पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. घटनेची वर्दी लागताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले. खानच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांचाही शोध सुरु असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगळे यांनी दिली