घराच्या नुतनीकरणाचे काम अर्ध्यावर, लॉकडाऊन सुरु झाल्याने नातेवाईकांकडे अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:30 PM2020-04-15T17:30:10+5:302020-04-15T17:30:49+5:30
नूर मोहम्मद यांनी कार्यालयातून रजा घेतली व घराचे काम सुरु केले मात्र घराच्या नुतनीकरणाचे काम अर्ध्यावर आलेले असताना कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने काम सध्या मजूर व इतर सामग्री उपलब्ध नसल्याने अर्ध्यावर सोडावे लागले.
खलील गिरकर
मुंबई : घराचे काम करण्यासाठी नूर मोहम्मद यांनी कार्यालयातून रजा घेतली व घराचे काम सुरु केले मात्र घराच्या नुतनीकरणाचे काम अर्ध्यावर आलेले असताना कोरोनाचा प्रभाव
वाढू लागल्याने देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने काम सध्या मजूर व इतर सामग्री उपलब्ध नसल्याने अर्ध्यावर सोडावे लागले. घराचे काम करण्यासाठी नूर यांनी आपले कुटुंबिय
शहराच्या दुसऱ्या भागात असलेल्या मेहुणीच्या घरात हलवले होते. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने आता मेहुणीच्या घरात वास्तव्य करणे भाग पडले आहे.
घराच्या नुतनीकरणासाठी संसार हलवावा लागला मात्र आता एकवीस दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत
भर पडली आहे. मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या घरांप्रमाणे छोटेसे घर असल्याने त्यामध्ये दोन कुटुंबांना राहणे अडचणीचे ठरते. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांच्याकडे दुसरा
कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आलेला दिवस कसा जाईल याची प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्या हाती काही उरलेले नाही. वर्क फ्रॉम होम द्वारे काम करण्यासाठी आवश्यक संगणक घरी राहिला आहे शिवाय मेहुणीच्या घरात संगणक आणला तरी त्यासाठी वायफाय व इतर सुविधा नव्याने मिळवताना नाकीनऊ येत असल्याने त्यांची चीडचीड होऊ लागली आहे.
मुलाकडे आले व त्याच इमारतीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने कॉरन्टाइन होण्याची वेळ : मुंब्रा येथील अमृतनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे वडिल व भाऊ त्याच्या कुटुंबियासह पिंपरी चिंचवड येथून आले होते. काही दिवस मुलाकडे राहून पिंपरीला परतण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र त्यांच्या परतण्यापूर्वीच देशात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना घरी जाता आले नाही. दुसऱ्या दिवसापासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. परिणामी त्यांचे पिंपरीला जाण्याचे मार्ग बंद झाले. पिंपरी जाण्याचे मार्ग बंद झाल्याने त्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत मुंब्रा येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर त्वरित रेल्वेचे तिकीट आरक्षित करुन जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र त्यापूर्वीच त्यांचे दुर्देव म्हणजे मुंब्रा परिसरात आढळलेला पहिला रुग्ण नेमका त्यांच्याच इमारतीत आढळला. त्यामुळे त्या दिवसापासून पुढील १४ दिवस त्यांना प्रशासनातर्फे घरातच कॉरंन्टाइन करण्यात आले. कॉरन्टाइन करण्यात आल्याने पिंपरी जाण्याचे तर बाजूलाच राहिले इमारतीच्या बाहेर निघण्याचा मार्ग देखील बंद झाला. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आता कधी एकदा कॉरन्टाइनची मुदत संपते व लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पार पडतो त्यानंतर लगेच पिंपरीला जाण्याचा बेत त्यांनी आखला आहे. त्याला नेमका कधी मुहूर्त मिळणार हे सांगणे मात्र सध्यातरी
कुणालाच शक्य नाही.