मुंबई : जागतिक तापमान वाढीमुळे हिमनग वितळू लागले असून, जगभरात वातावरणात उल्लेखनीय बदलही होत आहेत. याचाच परिणाम म्हणून पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या ऋतूतही सलगता राहिलेली नाही. आता तर समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी धोकादायक बनत असून, त्यामुळे २०५० पर्यंत म्हणजे ३१ वर्षांत अर्धी मुंबई पाण्याखाली जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
उपग्रहानी पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे (पान ७ वर) प्रसिद्ध झालेल्या संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे न्यूजर्सी येथील ‘क्लायमेट सेंट्रल’ संस्थेच्या ‘नेचर कम्युनिकेशन’ने म्हटले आहे. समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीचा फटका अनेक देशांना बसणार असून, २०५० पर्यंत यामुळे जगातील तब्बल १५ कोटी लोक बाधित होतील. महत्त्वाचे म्हणजे काही वर्षांनंतर सुमारे १५ कोटी लोकांकडे राहण्याचीही व्यवस्था नसेल.
चीन, बांग्लादेश, भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया व थायलंड यांना समुद्राच्या वाढत्या पाण्याचा पातळीचा फटका बसणार आहे. समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे जवळपास अर्धी मुंबई, नवी मुंबई तसेच कोलकाता ही शहरे पाण्याखाली जातील. समुद्राची पातळी वाढल्यास व्हिएतनामला सर्वाधिक फटका बसेल. आशियामधील शांघाय पाण्याखाली जाऊ शकते. उपग्रहाच्या मदतीने समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली आहे.
जागतिक तापमानवाढ, त्यामुळे वितळू लागलेला बर्फ, पाण्याची वाढू लागलेली पातळी यामुळे अनेक शहरे पाण्याखाली जातील, असे काही महिन्यांपूर्वी एका संशोधनामध्येही म्हटले होते. नव्या संशोधनात शहरे पाण्याखाली जाण्याची प्रक्रिया आधीपेक्षा जास्त वेगाने होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.मुंबईला वाचविण्यासाठी योजना आखणे गरजेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी मायग्रेशन संस्था को-ऑर्डिनेटर डायना लोनेस्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकांना वाचविण्यासाठी योजना आखण्याची सुरुवात करणे गरजेचे आहे.