Join us

महापालिकेतील निम्म्या बाऊन्सरना पाठविले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:04 AM

बाऊन्सरची नियुक्ती का केली, त्यांचा पगार कोण देणार, असे अनेक प्रश्न विरोधकांडून उपस्थित करण्यात आले होते.

मुंबई : पालिका मुख्यालयात सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. यामुळे टीकेचे धनी बनलेल्या आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी १८ पैकी नऊ बाऊन्सरना गुरुवारी कमी केले. तसेच त्यांची नियुक्ती केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यालाही त्यांनी समज दिल्याचे सूत्रांकडून समजतेगेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त असा वाद रंगत आहे. भाजपने मे महिन्यापासून आक्रमक भूमिका घेत पालिका मुख्यालयात आंदोलने केली. गेल्या आठवड्यात मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने झाली. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयाबाहेर खासगी बाऊन्सर तैनात करण्यास सुरुवात झाली होती. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. बाऊन्सरची नियुक्ती का केली, त्यांचा पगार कोण देणार, असे अनेक प्रश्न विरोधकांडून उपस्थित करण्यात आले होते.विरोधी पक्षाने याबाबत प्रशासनाला जाब विचारल्यानंतर यापैकी नऊ बाऊन्सरना काढण्यात आले. आयुक्त आणि चार अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या १८ बाऊन्सरपैकी नऊ बाऊन्सरना घरी पाठवण्यात आले आहे. आता पालिकेतील प्रवेशद्वार, अतिरिक्त आयुक्तांची कार्यालये आणि आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर नऊ बाऊन्सर तैनात आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका