आरटीईच्या निम्म्या जागा रिक्त, मुंबईमध्ये आतापर्यंत ३ हजार २७३ जागांचे प्रवेश झाले निश्चित
By स्नेहा मोरे | Published: May 31, 2023 08:05 AM2023-05-31T08:05:57+5:302023-05-31T08:06:18+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रियेत अजूनही ३ हजार १९७ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मुंबईत एप्रिल महिन्याच्या अखेरीस आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ मिळूनही मुंबईसारख्या महानगरात अजूनही निम्म्या जागा रिक्त असल्याचे उघड झाले आहे. याखेरीज, आरटीई प्रवेश प्रक्रियेत अजूनही ३ हजार १९७ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. मुंबई आतापर्यंत सहा हजार जागांपैकी केवळ ३ हजार २७३ जागांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे ‘अपलोड’ करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण मुंबई क्षेत्रात ८३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मितीही करण्यात आली आहे. या केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधाही आहे. जे पालक ऑनलाइन आणि मोबाइल ॲपद्वारे स्वतःहून अर्ज करू शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहे.
अजूनही या प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत अनेक बालके असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९’अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित कोट्यातून दरवर्षी मोफत प्रवेश देण्यात येतो.
गेल्या महिनाभरापासून आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, या प्रवेशांना मिळणारा प्रतिसाद संथ असल्याचे निदर्शनास आले आहे.
तीन वेळा मुदवाढ देऊनही अद्यापही मुंबईसह राज्यभरातील अनेक जागा रिक्त आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण करण्याची सूचना निवड यादीतील पालकांना देण्यात आली होती.
परंतु, त्यानंतर १५ पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली, त्यानंतर आता पुन्हा या प्रक्रियेला एक आठवडा मुदतवाढ देण्यात आली.
शाळेच्या प्रवेशस्तर वर्गाची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व अर्जांना प्रवेश देईल.
शाळेची प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या द्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. निवड झालेली यादी येथे प्रकाशित केली जाईल.
पालकांनी अर्ज क्रमांक भरून लॉगीन केल्यावर त्यांना यादी दिसेल व ॲडमिट कार्डची प्रिंट काढता येईल. पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा प्रवेशपात्र बालकाला प्रवेश देण्यात येईल.
आरटीई प्रवेश प्रक्रिया ही दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोनेरी संधी आहे. पालक–विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आर्थिक दुर्बल गटात अर्ज करून प्रवेश मिळविणाऱ्या पालकांची विशेष छाननी पथकामार्फत तपासणी करावी.
सुरेखा सोनावणे, पालक