मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये सुरू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्ण करण्याची तारीख मार्च, २०२४ अशी असली तरी त्यापूर्वीच ते पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्मारकाचे जवळजवळ पन्नास टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवासदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, येथील सगळी कामे प्रगतीपथावर आहेत. येथील पार्किंग व्यवस्था असो अथवा सभागृह.. सर्वच कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी आम्ही सातत्याने कामांचा आढावा घेत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री स्वत: या कामाचा आढावा घेत आहेत. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
स्मारकाचे काम दोन प्रकारे सुरू आहे. बेसचे काम ८० टक्के झाले आहे. पुतळ्याचे कामही सुरू आहे. पुतळ्याची उंची ३५० फूट तर चबुतऱ्याची उंची १०० फूट आहे. एका वेळी सुमारे १४ हजार नागरिक येथे सामावले जातील, अशी येथील व्यवस्था असून, काम लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.- एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयुक्त, एमएमआरडीए
५०० लोकांचे कामआता पुतळा २५ फुटांचा झाला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएकडून होकार मिळताच मोठ्या पुतळ्याचे काम सुरू होईल. आमच्यासोबत ५०० लोक काम करतील, अशी माहिती शिल्पकार राम सुतार आणि मुलगा अनिल सुतार यांनी दिली.