मुंबईतील निम्मे रस्ते खोदलेले!

By admin | Published: April 12, 2015 02:07 AM2015-04-12T02:07:57+5:302015-04-12T02:07:57+5:30

पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील ५० टक्के रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आली आहे़

Half roads in Mumbai are excavated! | मुंबईतील निम्मे रस्ते खोदलेले!

मुंबईतील निम्मे रस्ते खोदलेले!

Next

मुंबई : भूमिगत वाहिन्यांचे जाळे मोठे असल्याने विविध कामांसाठी सतत रस्ते खोदले जातात़ यामुळे होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी रस्ते दुरुस्तीचे काम करतानाच भूमिगत वाहिन्यांची कामेही आवश्यकतेनुसार घेण्याचा निर्णय झाला़ मात्र पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील ५० टक्के रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आली आहे़
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करीत ही बाब निदर्शनास आणली आहे़ मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने पंचवार्षिक कार्यक्रम आखला आहे़ याअंतर्गत सुमारे साडेसात हजार कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत़ त्यानुसार चर्चगेट ते दहिसर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंडपर्यंत सुमारे ३०० रस्त्यांच्या काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे़ पर्जन्य जलवाहिन्यांची कामं कुठल्या वॉर्डांमध्ये, कोणत्या रस्त्यावर सुरू आहेत, याबाबतची माहिती कोठारी यांनी मागविली होती़
त्यानुसार ए ते टी अशा २४ विभागांचे रेकॉर्ड पालिकेने पाठविले आहे़ यामध्ये प्रत्येक वॉर्डात सरासरी ७-८ रस्त्यांवर कामं सुरू असल्याचे दिसून येते़ मुंबईत अनेक पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे़मात्र या कामात नियोजन व समन्वय नसल्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे़ या सर्व कामांची डेडलाइन जानेवारी २०१६ असल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे़
महत्त्वाच्या रस्त्यांवरील कामे
अब्दुल रेहमान स्ट्रीट, पी़ डीमेला रोड, मोहंमद अली रोड, दत्ताराम लाड मार्ग, खडा पारसी जंक्शन, एऩ एम़ जोशी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, बरखत अली दर्गा रोड, सायन सर्कल, दादर टीटी, बरकत अली दर्गा मार्ग, सायन हॉस्पिटल जंक्शन, दोस्त एकर रोड, शिवडी कोळीवाडा रोड,
जेरबाई वाडिया मार्ग, संत गाडगे महाराज मार्ग़ (प्रतिनिधी)

मुंबईकरांचे हाल
रस्त्यांच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावून मार्ग वळविण्यात आले आहेत अथवा वाहतुकीसाठी रस्ता कमी उरला आहे़ परिणामी वाहतूक संथगतीने सुरू असल्याने मुंबईकरांना कार्यालय व घरी पोचण्यास उशीर होऊन महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होत आहे़

आरोग्यालाही धोका
विविध पायाभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या खोदकामांबरोबरच मुंबईत शेकडो व्यावसायिक व निवासी इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे़ सततच्या या बांधकामांमुळे धुळीचा त्रास, त्यामुळे दम्याचा त्रास बळावतो आहे़

Web Title: Half roads in Mumbai are excavated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.