मुंबई : एटीएममध्ये रोख भरण्यासाठी बँकांकडून जेमतेम ४५ टक्केच पुरवठा होत आहे, असा दावा कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) केला आहे.एटीएमच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बँकांकडून स्वतंत्र कंपन्यांची नेमणूक केली जाते. या कंपन्या एटीएममध्ये रोखही भरतात. सीएटीएमआय या कंपन्यांची संघटना आहे. सीएटीएमआयनुसार, देशभरात सर्व बँकांची जवळपास २ लाख एटीएम आहेत. त्यापैकी ७५ टक्के एटीएम सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात सरकारी बँकांचे आहेत. त्यातही स्टेट बँकेच्या एटीएमचा आकडा सर्वाधिक आहे.नोटाटंचाईआधी एटीएममध्ये रोख भरण्यासाठी सरकारी व खासगी बँकांकडून मागणीच्या ९० टक्के पुरवठा होत होता. आता हा पुरवठा अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे. खासगी बँका मागणीच्या ६० टक्के रोख देत आहेत. पण सरकारी बँकांकडून तर जेमतेम ३० टक्के रोख एटीएममध्ये भरण्यासाठी पुरवली जात आहे. कुठल्याही एटीएममध्ये साधारण अडीच दिवस पुरेल, एवढी रोख भरली जाते. पण एकीकडे कमी मिळणारी रोख व त्याचवेळी रोख काढण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे एटीएम लवकर ‘रिकामे’ होत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी रोख बँका करन्सी चेस्टमध्ये जमा करतात. या करन्सी चेस्टद्वारे ती शाखांना तसेच एटीएमसाठी पुरवली जाते. सर्व बँकांचे मिळून देशभरात ४०३४ करन्सी चेस्ट आहेत. पण त्यापैकी १८९ करन्सी चेस्ट सध्याठप्प पडल्याचा दावा सीएटीएमआयने केला आहे.परिस्थिती २४ तासांत नियंत्रणात येईलस्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नोटाटंचाईवर दोन दिवसांनी भाष्य करीत ही परिस्थिती २४ तासांत नियंत्रणात येईल, अशी हमी दिली. ही समस्या सर्वत्र नाही. प्रामुख्याने तेलंगणा व बिहारमधील एटीएममध्ये रोखीची समस्या होती. तेथे मुबलक प्रमाणात रोख पुरविली जात आहे. गुरुवार सायंकाळपर्यंत ही रोख त्या क्षेत्रात पोहोचून शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्थिती नियंत्रणात येईल, असे रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले.शुल्क वाढविण्याची मागणी : दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात पाचपेक्षा अधिक वेळा रोख काढल्यास खातेदारावर १५ रुपये शुल्क लावले जाते. या शुल्कात तीन ते पाच रुपये वाढीची मागणी सीएटीएमआयने केली आहे. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एटीएम आॅपरेटर्स कंपन्यांसाठी कडक नियमावली लागू केली. या नियमावलीमुळे खर्चात वाढ झाली. तो खर्च भरून काढण्यासाठी शुल्कात वाढ व्हावी, असे सीएटीएमआयचे म्हणणे आहे.‘पीओएस मशीन’द्वारे रोख काढानोटाटंचाईपासून खातेदारांना दिलासा देण्यासाठी स्टेट बँकेने ‘पॉइंट आॅफ सेल’ अर्थात ‘पीओएस मशीन’द्वारे रोख काढण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्याद्वारे प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांमध्ये १००० व उर्वरित सर्व ठिकाणी २००० रुपयांपर्यंतची रक्कम नि:शुल्क काढता येईल. बँकेचे देशभरात ६.०८ लाख पीओएस आहेत. त्यापैकी ४.७८ लाख पीओएसद्वारे रोख मिळण्याची सोय करण्यात आली आहे.
एटीएमसाठी नोटांचा पुरवठा निम्माच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:29 AM