मुंबई : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच रामलीला आयोजित करणाऱ्या मंडळांना परवानगीसाठी यंदापासून ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या मैदानावर रामलीला आयोजित करणाऱ्यांना मैदानाच्या भाड्यात निम्म्याने कपात करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन शुल्कही रद्द करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.नवरात्रीचे नऊ दिवस रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मंडळांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रथमच पालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. रामलीलासाठी विविध संस्थांकडून परवानगी न मिळाल्याने नाराज झालेल्या रामलीला आयोजकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात एक बैठक बोलावली होती. या बैठकीला पालिका अधिकारी, पोलिस विभाग, अग्निशमन दल आणि इतर विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत लोढा म्हणाले की, रामलीलाचे आयोजक आपली संस्कृती आणि वारसा पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास देणे अजिबात योग्य नाही. विशेषत: आझाद मैदानावर रामलीला आयोजित करणाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांना पालिकेने सहकार्य करावे व मैदानाचे शुल्क ५० टक्के कमी करावे, अशा मागण्या केल्या होत्या. कौशल्य विकास विभाग मंत्री व पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत रामलीलाच्या आयोजनावेळी आजवर आलेल्या अडचणींवर तोडगा काढत असताना मुंबई महापालिकेला त्यांनी काही निर्देश दिले होते. या मागण्यांची पूर्तता पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
रामलीला कार्यक्रमासाठी मिळालेल्या परवानग्यागणेशोत्सव/नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामलीला कार्यक्रमासाठी ‘एक खिडकी योजना’ तयार होणार.रामलीलासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानाच्या भांड्यामध्ये ५० टक्के सवलत मिळणार.कार्यक्रमाच्या ठिकाणी ५००च्यावर लोक जमा होणार असतील तर अग्निशमन सेवा नि:शुल्क.
रामलीला आयोजकांना पहिल्याच बैठकीत दिलासा - दरवर्षी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची पालिका प्रशासनाबरोबर बैठक घेतली जाते. मंडळांच्या अडचणी, परवानग्यांबाबतचे प्रश्न न सोडवले जातात. - नवरात्रोत्सव मंडळांनाही त्याचा लाभ होतो; पण गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतीयांचा सण असलेल्या छट पूजेसाठी विविध सुविधा देण्याची मागणी होऊ लागली होती. - आझाद मैदानावर रामलीला कार्यक्रम आयोजित केला जात असून, त्याला उत्तर भारतीय समाज गर्दी करतो. त्यामुळे आता रामलीला मंडळांच्याही समस्या पालिका सोडवणार आहे.