Join us

आता हाफकिन बायोफार्मा करणार कोव्हॅक्सिनच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आत्मनिर्भर भारत ३.० कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आत्मनिर्भर भारत ३.० कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन बायोफार्मा कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी पूर्वतयारी करीत आहे. त्यानुसार, येत्या काही काळात कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन करण्यात येईल.

संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग सातत्याने वाढविण्यात येत आहे. लसींच्या मात्रांचे उत्पादन हाफकिन कंपनीच्या परळ येथील संकुलात केले जाईल.

हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी सांगितले, एका वर्षात कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून ६५ कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून ९४ कोटी रुपयांचे अनुदान दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला ही क्षमता बांधणी सहायक ठरेल, असे जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि बीआयआरएसी अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले.

या कामासाठी आठ महिन्यांचा कालावधी मंजूर करण्यात आला असून लस उत्पादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

..........................................