मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील दोन अधिकाऱ्यांना इतरत्र स्थलांतरित केले जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे कार्यालय असलेले सातव्या मजल्यावरील दालनही अजित पवार यांना देण्यात आले आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या पाच दिवस त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून मंत्रालयातील दालनाचा शोध घेतला जात होता. या शोध मोहिमेनंतर अखेर पवार यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर दालन मिळाले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी बाजूचेच कार्यालय अजित पवारांना देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याविषयी शुक्रवारी शासन निर्णय काढून त्यांचे कार्यालय निश्चित केले आहे. आता सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये असतील.