बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३ एप्रिलपासून उपलब्ध होणार हॉल तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:06 AM2021-04-02T04:06:58+5:302021-04-02T04:06:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाईल. त्यानुसार आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाईल. त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅल तिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असेल.
विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकिटावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का त्या हॉल तिकिटावर असणे आवश्यक आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर हॉल तिकिटामध्ये विषय, माध्यम, नाव व इतर काही दुरुस्ती असेल तर त्याबाबत माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने मंडळामार्फत हॉल तिकिटावर दुरुस्ती करून घ्यायची आहे. दुरुस्तीची एक प्रत बोर्ड कार्यालयात सुद्धा शाळांनी पाठवायची आहे.
परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्याला हॉल तिकीट द्वितीय प्रत (डुप्लिकेट कॉपी) प्रिंट करून द्यायची आहे. त्यावर डुप्लिकेट हा शेरा द्यावा, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हॉल तिकिटावरील फोटो सदोष असल्यास मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का त्यावर घ्यायचा आहे. जेणेकरून, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना हॉल तिकीट संदर्भात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाने पालक, विद्यार्थी, महाविद्यालयांना व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
* पुढच्या वर्षी हाॅल तिकीट ऑनलाइन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर यंदा नाही मात्र पुढील वर्षात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. दरवर्षी दहावी - बारावीसाठी सुमारे ३० ते ३२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. हाॅल तिकीट घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षात पुणे बोर्डाकडून स्वतंत्र वेबसाईट (संकेतस्थळ) सुरू करून त्यावरून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट काढून घेता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.