Join us

भय नाट्यांनी साजरा झाला 'हॅलोविन डे'! पाच बाल नाटुकल्यांनी केले रसिकांचे मनोरंजन

By संजय घावरे | Published: November 02, 2023 8:13 PM

जगात बऱ्याच ठिकाणी हॅलोविन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

मुंबई - लहान मुलांना स्वत: बालनाट्ये सादर करता यावी या उद्देशाने चिल्ड्रन्स थिएटर अॅकॅडमीने 'हॅलोविन डे'चे औचित्य साधत भय नाट्यांचा प्रयोग सादर केला. या अंतर्गत लहान मुलांनी लेखन, दिग्दर्शन, अभिनय करून सादर केलेल्या पाच विनामूल्य नाटुकल्यांना रसिकांचीही दाद मिळाली. जगात बऱ्याच ठिकाणी हॅलोविन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

अलिकडच्या काळात भारतातही याबाबतचे आकर्षण वाढू लागले आहे. या दिवसाचे औचित्य साधत काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पाच बाल नाटुकल्यांचा प्रयोग सादर करण्यात आला. यात 'त्या हॅलो विनच्या रात्री', 'तो कोण होता?', 'नेव्हर एंडींग', 'वन स्ट्रेंज फ्रेंड' आणि 'दोन विचित्र घरे' या १०-१५ मिनिटांच्या नाटुकल्यांचा समावेश होता. नाटकाच्या शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत सर्व कामे मुलांनीच केली. संस्थेने केवळ नेपथ्यकार दिला आणि अंतिम तालिम पाहिली. मुलांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाशयोजना करण्यात आली. कॉस्च्युम्सही मुलांनीच तयार केला. यातून मुलांना आत्मविश्वास मिळाला आणि याचे खूप चांगले रिझल्टस समोर आल्याचे संस्थेचे संचालक राजू तुलालवार यांनी सांगितले. 

तुलालवार म्हणाले की, आज जरी बालनाट्य सादर होत असली तरी त्यात मोठ्यांचाही सहभाग असतो. बालनाट्ये मोठेच लिहितात आणि तेच दिग्दर्शित करतात. मुले फक्त काम करतात. असे होता कामा नये.  राज्य नाट्य स्पर्धेत ३०० स्पर्धक सहभागी होतात, पण तिथेही सर्वाधिक बक्षीसे मोठ्यांनाच मिळतात. बालकांना फक्त अभिनयाची पारितोषिके मिळतात. बाल कलाकार-तंत्रज्ञ घडवायचे असतील तर बाल रंगभूमी बालकांच्या ताब्यात द्यायला हवी या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. १० ते १४ वर्षे वयोगटातील मुले स्वत: नाटक बसवू शकतात. 

पुढील पिढी घडवण्याच्या हेतूने मुलांना मुलांचे बालनाट्य करायला देण्याचा प्रयोग मागील पाच वर्षांपासून करत आहोत. त्या अंतर्गत दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर नाटक करायला देतो. मागच्या वर्षी ख्रिसमस होता, तर यंदा 'हॅलो विन डे' निवडला. लहान मुलांना हसायला आवडते तशी भीतीही आवडते. त्यामुळे यंदा हॅलो विन डेचे निमित्त साधत मुलांना दोन महिन्यांपूर्वीच भय नाट्यासाठी विषय दिले. दीड महिन्यापूर्वी मुलांचे ग्रुप केले गेले. त्यांनी स्वत:चे विषय ठरवले आणि तालिमी केल्या.

टॅग्स :मुंबई