Join us

अतिक्रमणावर उत्सवानंतर हातोडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 4:03 AM

पावसाळ्यामुळे सिडकोची अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम थंडावली आहे. त्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. विशेषत: नैना क्षेत्रात बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच आहे.

नवी मुंबई : पावसाळ्यामुळे सिडकोची अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम थंडावली आहे. त्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. विशेषत: नैना क्षेत्रात बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच आहे. याची गंभीर दखल सिडकोच्या संबंधित विभागाने घेतली आहे. याचा परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पुन्हा धडक कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील सूत्राने दिली.नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळताच या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र विविध कारणांमुळे या विकास आराखड्याच्या मंजुरीची प्रक्रिया रखडल्याने याचा फायदा भूमाफियांनी घेतला आहे. सिडकोच्या कारवाईला केराची टोपली दाखवत सररासपणे विनापरवाना बांधकामे उभारली जात आहेत. या अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोचा संबंधित विभाग सुरुवातीपासून अपयशी ठरला आहे. नैनाच्या विस्तीर्ण क्षेत्राच्या तुलनेत सिडकोच्या संबंधित विभागाकडे अत्यंत अपुरे मनुष्यबळ व साधनसामग्री आहे. त्यामुळे या विभागाच्या कामकाजाला मर्यादा पडल्या आहेत. एकूणच या क्षेत्रात अतिक्रमण विभागाची कारवाई अत्यंत प्रभावहीन ठरल्याने बांधकामधारकांचे चांगलेच फावले आहे. असे असले तरी सिडकोने आता या बांधकामांची गंभीर दखल घेतली आहे. (प्रतिनिधी)