महागड्या लसणाची चाेरी केली म्हणून हमालाची २५ जणांसमोर हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:57 AM2023-12-16T09:57:45+5:302023-12-16T09:59:02+5:30
बघ्यांनी फक्त व्हिडीओ बनवला; बोरीवलीतला धक्कादायक प्रकार
मुंबई : लसूण चोरी केल्याच्या संशयातून पंकज मंडल (४६) नावाच्या हमालाला मारहाण करत त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना २५ जणांच्या समोर घडली. बुधवारी रात्री हा दुर्दैवी प्रकार घडताना आसपास असलेल्यांनी बघ्याची भूमिका घेत घटनेचा व्हिडीओ बनवला; मात्र त्याला वाचवायला पुढे आले नाही. बोरीवली पोलिसांनी याप्रकरणी घनश्याम आगरी (५६) या लसूण व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
बोरीवली भाजी मार्केटमध्ये हमालीचे काम सुरू असताना घनश्यामने मंडल यांची कॉलर पकडून रागाने बोलत मंडल यांच्या गुप्तांगावर जोरात मारहाण केली.भांडण सोडवायला गेलेल्यांना त्यांने जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे उपस्थित जवळपास २५ जणांनी काहीच न करता बघ्याची भूमिका घेतली. शेख वारंवार घनश्यामला मारू नका, असे सांगत होते; मात्र तो काहीच ऐकत नव्हता. अखेर आसिफ नावाच्या मित्राने मंडल यांची सुटका करत त्यांना एमटीएनएल गेटजवळ नेले.
पाच लेकरे वाऱ्यावर...
मंडल हे झारखंड राज्याच्या साहेबगंज जिल्ह्यातील राहणारे होते. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चार मुले आणि एक मुलगी आहे, जी त्यांच्या दोन पत्नींसोबत राहतात.
त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देत बोरीवलीतील मित्रांनी थोडे-थोडे पैसे जमा करून अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह झारखंडला नेण्याची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी मंडल मृतावस्थेत आढळले. मंडल यांनी लसणाची २५ किलोंची एक आणि ६ हजार ४०० रुपये किमतीची गोणी चोरी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून मंडल हे आरोपी घनश्याम याचा लसूण चोरी करत होते, असे त्याचे म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही यातील तथ्य पडताळत आहोत. चोरीबाबत तपास सुरू आहे.-निनाद सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोरीवली पोलिस, ठाणे
घनश्याम हा मंडल यांना मारत असताना ते सतत मी फक्त गोणीची हमाली केली. मी ती चोरली नाही. मी ती गाडीवर चढवली. त्यासाठी मला १० रुपये मिळाले, असे सांगत होते, तसेच मरेपर्यंत त्यांच्याकडे लसणाची कोणतीही गोणी आढळली नाही.- आरशेद शेख, तक्रारदार