मुंबई - मध्य रेल्वेने सर्व श्रेणीतील ११० स्थानकांवरील हमालीचे दर जवळजवळ दुप्पट केले असून, त्याचा बोजा प्रवाशांवर पडणार आहे. ४० किलोपासून १६० किलोपर्यंतचे सामान वाहून नेण्याच्या आणि रुग्णांना नेण्यासाठीच्या दरांचा यात समावेश आहे. पूर्वी ४० किलोपर्यंतचे लगेज डोक्यावरून वाहून नेण्यासाठी ५० रुपये हमाली द्यावी लागत होती; पण आता ७५ ते ८५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर दुचाकी किंवा चारचाकी बॅरोने १६० किलोच्या लगेजसाठी प्रतिफेरी ८० ऐवजी आता १३५ रुपये हमालांना द्यावे लागतील. गाडी येईपर्यंत हमालांना थांबवून ठेवण्यासाठी पहिल्या अर्ध्यासाठी 'प्रतीक्षा शुल्क' (वेटिंग चार्जेस) आकारले जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
लोकमत'च्या वृत्ताची दखल मध्य रेल्वेच्या दादर (पू) आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर हमालांच्या मनमानी शुल्क आकारणी बाबतचे वृत्त काही दिवसांपूर्वी 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रविवारी हे नवे दरपत्रक जाहीर केले.
नवे दर जाहीर केले असले तरी त्याची अंमलबजावणी होत असल्याची खात्री प्रशासनाने करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले दर हे प्रवाशांतील काही आर्थिक दुर्बल घटकांसाठी जाचक ठरू शकतात. त्यांच्यासाठी नाममात्र शुल्कावर विमानतळा प्रमाणे टर्मिनसवर लगेज ट्रॉलीची व्यवस्था करावी. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी परिषद
सुधारित दर प्रसिद्ध केले असले तरी ते खूप कमी आहेत. आम्हाला विचारात न घेता है दर ठरवण्यात आले आहेत. वेटिंग चार्जेससाठी प्रवाशांना विनवणी करावी लागते. रेल्वेने आम्हाला चतुर्थश्रेणी कामगारांप्रमाणे सेवेत घेतले तर आम्हाला आणि प्रवाशांनाही त्याचा फायदा होईल. - हमाल प्रतिनिधी
हमालीचे नवे दर (प्रति ४० किलोसाठी)
• मोठी - १ ते ४ श्रेणी एनएसजी स्थानके ८५ रु.
• मध्यम एसजी १, एसजी २, एसजी ३ मुंबई/पुणे विभाग आणि एनएसजी ५ श्रेणी स्थानक : ८० रु.
• लहान एचजी १, एचजी २, एचजी ३ आणि एनएसजी ६ श्रेणी स्थानक : ७५ रु.
• वेटिंग चार्जेस : अर्ध्या तासानंतर लागू
• दादर पूर्व आणि पश्चिमदरम्यान सामान वाहतुकीसाठी : ८५ रु. = २ ते ४ चाकांच्या बॅरोसाठी प्रतिफेरी (१६० किलोपर्यंत) : १३५ रु. • आजारी/अपंग व्यक्त्तीस व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवरून नेण्यासाठी : १३५ (दोन हमाल) / २०५ (चार हमाल)