नवी मुंबई : घणसोली नोडमधील तळवली येथील आठ अनधिकृत चाळींवर सिडको व महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला. पोलिसांनी बळाचा वापर करून रहिवाशांना बाजूला केले. तळवली सेक्टर २२मधील अंदाजे ४५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर आठ अनधिकृत चाळींचे बांधकाम करण्यात आले होते. या भूखंडाचे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले होते. संबंधितांना भूखंड खाली करून देण्यासाठी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकप्रमुख शिवराज एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अतिक्रमण मोहीम राबविली. कारवाईसाठी १० अधिकारी व ९० पोलीस तैनात केले होते. तरीही नागरिकांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. घरे पाडल्यास आमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून नागरिकांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी कारवाई करणाऱ्या पथकासमोर स्वत:ला झोकून दिल्याने त्यांना हटविण्यासाठी बळाचा वापर करून बाहेर काढावे लागले. दिवसभरात अतिक्रमणविरोधी पथकाने ८० खोल्या हटविल्या. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. २ पोकलेन, १ जेसीबी, ट्रक, ६ जीप व ३० कामगार होते. मोहिमेमध्ये पी. बी. राजपुत, सुनील चिडचाले, इ. एम. मेनन, एम. सी. माने, व्ही. व्ही. जोशी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सिडको व महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही आयुष्याची कमाई खर्च करून घरे विकत घेतली. चाळी अनधिकृत होत्या, तर त्या बांधल्या जात असताना सिडको व महापालिका गप्प का होती. तेव्हाच कारवाई केली असती तर आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आठ चाळींवर हातोडा
By admin | Published: January 11, 2017 6:40 AM