Join us

व्होट बँकेवर पडणार हातोडा

By admin | Published: October 15, 2016 7:18 AM

वांद्रे येथील बेहरामपाड्यातील चार मजली झोपडी कोसळून सहा निष्पाप जीव गेल्यामुळे बेकायदा झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : वांद्रे येथील बेहरामपाड्यातील चार मजली झोपडी कोसळून सहा निष्पाप जीव गेल्यामुळे बेकायदा झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय दबावानंतर रेंगाळलेल्या झोपड्यांवरील कारवाईला आता वेग येणार आहे. १४ फुटांपेक्षा उंच झोपड्या पाडण्याची कारवाई बेहरामपाड्यापासून सुरू झाली आहे. मात्र या कारवाईने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले असून, व्होट बँक वाचविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.१४ फुटांहून उंच झोपड्यांवरील कारवाईला राजकीय पक्षांकडून विरोध होत असतानाही आयुक्त अजय मेहता आपल्या निर्णयावर ठाम होते. अशा झोपड्यांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही कारवाई रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढू लागला. त्यामुळे ही कारवाई सुरू होण्यापूर्वीच बारगळली होती. दरम्यान, गुरुवारी वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यामध्ये चार मजली झोपडी बाजूच्या शाळेवर कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत सहा निष्पाप मुले मृत्युमुखी पडली. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. अशा शेकडो बेकायदा झोपड्यांचे टॉवर मुंबईत अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे या झोपड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लाखो जिवांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. परिणामी, आज बेहरामपाडा येथे बेकायदा झोपड्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. ही कारवाई पुढे अन्य विभागांतील झोपड्यांवरही होणार असल्याचे समजते. मात्र राजकीय खोडा नको म्हणून याबाबत प्रशासन सावध पावले उचलत आहे. (प्रतिनिधी)