लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत पावसाळ्याची सुरुवात होत असताना मालाड मालवणीतील शेकडो घरांवर पालिकेने मंगळवारी कारवाई केली. मालवणीच्या गेट क्रमांक आठमध्ये मंगळवारी या घरांवर कारवाई करण्यात आली. या घरांवर बुलडोजर चालवत ही घरे उद्ध्वस्त करण्यात आली. मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या परिस्थितीत लहान मुलांना घेऊन आम्ही कुठे जाणार, असा सवाल महिलांकडून विचारला जात आहे. त्यात रमझान सुरू असताना तो साजरा करण्याच्या आनंदावर पालिकेच्या कारवाईमुळे विरजण पडले आहे. मंगळवारी दुपारी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पक्क्या घरांवर फिरणारा बुलडोजर पाहून रडण्याशिवाय स्थानिकांकडे पर्याय नव्हता. या वेळी कोणताही राजकीय पक्ष या नागरिकांच्या मदतीला आला नाही. जवळपास तीन ते चार तास ही कारवाई सुरू होती. स्थानिकांना याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पालिकेच्या पी उत्तर विभागाचे म्हणणे होते. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मालवणीत शेकडो घरांवर हातोडा
By admin | Published: May 31, 2017 6:48 AM