विमानतळ परिसरातील बेकायदा हॉटेलवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:47 AM2018-08-11T01:47:56+5:302018-08-11T01:47:59+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बेकायदेशीररीत्या बांधलेले हॉटेल महापालिकेने जमीनदोस्त केले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बेकायदेशीररीत्या बांधलेले हॉटेल महापालिकेने जमीनदोस्त केले आहे. एमएमआरडीएने आपल्या अखत्यारीतील हे बांधकाम तोडण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने पुढाकार घेऊन ही कारवाई केली. मात्र, या कारवाईत अडथळा आणण्यासाठी संबंधितांनी बाऊन्सर तैनात केले होते. त्यामुळे पोलिसांची कुमक मागवून ही कारवाई करण्यात आली.
विलेपार्ले-अंधेरी पूर्व भागात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून तळ अधिक दोन मजल्यांचे बांधकाम गेल्या सात महिन्यांपासून सुरू होते. ३० खोल्या व १० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकार असणाऱ्या या बांधकामाचा वापर निवासी हॉटेल पद्धतीने होण्याची शक्यता होती. मात्र विमानतळाजवळ अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम असणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. त्यामुळे या बांधकामावर नियोजन प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएला कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या होत्या.
मात्र, प्राधिकरणाने हात वर केल्यामुळे महापालिकेने या बांधकामाला नोटीस बजावत २४ तास पूर्ण होताच गुरुवारी बांधकाम तोडून टाकले. कारवाईला गेलेल्या पालिकेच्या पथकाला बाऊन्सरचा सामना करावा लागला. त्यानंतर पोलीस उपायुक्त सुनील कुंभारे यांनी पथकाला संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तत्काळ पाठविला. त्यानंतर अवघ्या १२ तासांत महापालिकेच्या पथकाने ते तीन मजली बांधकाम जमीनदोस्त केले. तर दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
>तळ अधिक दोन मजल्यांचे बांधकाम
विमानतळाला लागून असलेले हे हॉटेलचे बांधकाम तळ अधिक दोन मजल्यांचे होते. यामध्ये ४० खोल्या काढण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे बांधकाम तोडता आले आहे. याबाबत शहर दिवाणी न्यायालयात कॅवेट दाखल करून हे बांधकाम तोडण्यात आल्याचे प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.
>के पश्चिमचे दोन अभियंते निलंबित
वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाºया के पश्चिम विभागाच्या दोन अधिकाºयांना निलंबित करण्यात आले आहे. राजीव गैैरव आणि नरेश लाड या दोन कनिष्ठ अभियंत्यांवर के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.
विभागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी या दोन कनिष्ठ अभियंत्यांवर होती. मात्र वारंवार कारवाईचे आदेश दिल्यानंतरही हे अधिकारी कारवाईचा केवळ देखावा करीत होते. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांना निलंबित केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.