लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फुटबॉल स्पर्धेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या व पंतप्रधानांकडून गौरविण्यात आलेल्या किंग्ज सर्कल येथील मेरी नायडू या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पालिका पुन्हा कारवाई करणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा तिचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे. मेरी नायडू वास्तव्य करत असलेली झोपडी पालिका वारंवार जमीनदोस्त करत असल्याने, आता नेमके राहायचे तरी कुठे? हा प्रश्न मेरीच्या कुटुंबाला पडला आहे.
वर्षभरापूर्वी उद्यान करण्यासाठी पालिकेने मेरीची झोपडी जमीनदोस्त केली होती. त्यामुळे नाइलाजाने मेरीच्या कुटुंबाने रस्त्याच्या कडेला पदपथावर संसार थाटला. मात्र मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी पुन्हा उद्यानात झोपडी बांधली. मात्र ही झोपडीसुद्धा पालिका तोडणार असल्याने कोरोनाच्या संकटकाळात आता जायचे कुठे? असा प्रश्न मेरीच्या कुटुंबाला पडला आहे. एका सामाजिक संस्थेने गरीब मुलांसाठी सुरू केलेल्या प्रशिक्षणात ती फुटबॉल खेळू लागली. फुटबॉलमध्ये तिने राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. २०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनेक जिल्हा व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये बाजी मारत तिने १००हून अधिक पदक व प्रमाणपत्रांवर आपले नाव कोरले आहे.मेरीचे वडील कंत्राटी कामगार होते, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गेली. यामुळे घरातील तीन मुलींचे शिक्षण व पालनपोषण कसे करावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.माझी देशासाठी खेळायची इच्छा आहे. मात्र सध्या राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. पालिका आमच्या घरावर कारवाई करते. राजकीय व्यक्तींनी मला घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणीही मदत केली नाही. कोरोनाच्या काळातही कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगले, तेव्हा कोणी साधी विचारपूसही केली नाही.
- मेरी नायडू