मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा
By मनोहर कुंभेजकर | Published: October 5, 2023 05:51 PM2023-10-05T17:51:43+5:302023-10-05T17:54:01+5:30
विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला.
मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड मधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/ उत्तर विभाग कार्यालयाने कंबर कसली आहे. विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला.
पी/ उत्तर विभाग कार्यालयाने आज चिंचोली फाटक, दर्गाह मशिदी जवळील एस व्ही रोड रुंदीकरणात बाधित होत असलेली 24 , व उंदेराई जंक्शन वरील 15 अशी एकूण 39 बांधकामे हटवण्याची कार्यवाही पी/उत्तर विभाग कार्यालयामार्फत पार पाडण्यात आली.
सदरची कार्यवाही उपायुक्त परिमंडळ 4चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची रूपरेषा व आखणी नुसार सहाय्यक अभियंता मंदार चौधरी व सह-अभियंते यांनी प्रत्यक्षात अमलात आणली व बाधित झालेली बांधकामे दोन जेसीबी सयंत्र , दहा कामगार आणि सात अभियंते मार्फत निष्कासित करण्यात आल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली.