मुंबई : चेंबूरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ९० फुटांचा प्रस्ताव असताना प्रस्तावामध्ये आणखी ३० फूट वाढ केल्याने चेंबूरच्या अमर महल परिसरात असलेल्या दोनशे दुकानदारांवर पालिकेचा हातोडा पडणार आहे. मात्र त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी पालिकेने चार दुकाने हटविली. त्यामुळे सर्व दुकानदार सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. चेंबूरच्या अमर महल परिसरात विविध फर्निचर आणि किराणाची दोनशे दुकाने आहेत. या दुकानांसमोर असलेल्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने ती हटविण्यात येणार आहेत. पालिकेने त्यासाठी कुर्ला, चेंबूर आणि माहुल परिसरात जागा देऊ केली आहे. व्यापाऱ्यांनी त्यास मान्यता दिली असली तरी अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. मात्र चार दिवसांपासून पालिका अधिकारी अचानक तेथे दुकाने खाली करण्याची जबरदस्ती करत असून चार दुकाने जमीनदोस्त केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
चेंबूरमध्ये पर्यायी जागा देण्यापूर्वी दुकानांवर हातोडा
By admin | Published: March 24, 2017 1:23 AM