Join us

वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा

By admin | Published: July 03, 2014 11:09 PM

खोपोली शहरातील काजूवाडी येथील वन विभागाच्या जागेत एका व्यक्तीने अनधिकृतपणे पक्क्या घराचे बांधकाम केले होते.

खालापूर : खोपोली शहरातील काजूवाडी येथील वन विभागाच्या जागेत एका व्यक्तीने अनधिकृतपणे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. त्या बांधकामावर वन विभागाने आज हातोडा मारीत बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वन विभागाने केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.शहराच्या काजूवाडी या वन विभागाच्या टेकडीवर अनधिकृत बांधकामांचा विषय गेली अनेक वर्षे सतत चर्चेत होता. यातील काही बांधकामे हे जुनी असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आड येत असल्याने अलीकडे याच ठिकाणी केशव देवकर या इसमाने मोकळ्या जागेत राहण्यासाठी पक्के घराचे अनधिकृत बांधकाम करण्यास सुरु वात केली होती. दगड, सिमेंट, विटा साहित्य वापरून घर उभारणीचे काम सुरु असल्याने खालापूर वन विभागाने बांधकाम करणाऱ्या संबंधित व्यक्तीला नोटीस देवून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही बांधकाम सुरूच राहिल्याने अखेर सहायक वन संरक्षक लाड, खालापूर वन परिक्षेत्र अधिकारी के. आर. सोनावणे, खोपोली वनपाल परहार यांच्यासह पन्नास वन कर्मचारी, ठाणे येथून वन जमिनीतील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राखीव असलेली राज्य राखीव दलाची एक तुकडी , खोपोली पोलिस असा मोठा फौजफाटा यांनी हातोडा मारीत झालेले संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले . केशव देवकर यांचेवर महाराष्ट्र वन जमीन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे . शहराच्या इतर भागात आणि तालुक्यात देखील वन जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे . (वार्ताहर)