मुंबई : पालिकेचा शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाची परवानगी न घेता अॅण्टॉप हिल परिसरात गेल्या चार वर्षांपासून एक शाळा अनधिकृतरीत्या चालवली जात होती. स्थानिक भाजपा नेत्याची ही शाळा असल्याने यावर अनेक दिवस कारवाई झाली नाही. मात्र ‘लोकमत’ने या अनधिकृत शाळेचे वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा पाडण्यात आली. अॅण्टॉप हिल परिसरातील कामराज नगर या झोपडपट्टी परिसरात गेल्या चार वर्षांपासून ही अनधिकृत शाळा चालवली जात होती. कलेक्टरच्या मालकीचा भूखंड असलेल्या या जागेवर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ही शाळा उभारण्यात आली होती. पालिकेच्या शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागानेदेखील परवानगी या शाळेला दिलेली नसल्याची माहिती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष साबळे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवली. याहून धक्कादायक बाब म्हणजे या शाळेच्या छतावरून विजेच्या हाय व्होल्टेज तारा जात असताना शाळेवर दोन मजले चढवण्यात आले होते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दोन महिन्यांपूर्वी कलेक्टरकडून या शाळेवर नावापुरती कारवाई करण्यात आली होती. परिसरातील एका भाजपा नेत्याच्या मालकीची ही शाळा असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप काही रहिवाशांनीदेखील केला होता. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने या अनधिकृत शाळेबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच दखल घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयाने या शाळेवर तोडक कारवाई केली. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
अनधिकृत शाळेवर अखेर हातोडा
By admin | Published: March 08, 2016 2:18 AM