मुंबई : आपली कला प्रामाणिकपणे सादर करणाऱ्या कलावंतावर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उपासमारीची वेळ आली आहे. गेले सव्वा वर्ष हाताला काहीच काम नसल्याने या कलावंतांवर निराशेची छाया आहे. अशा स्थितीत जगायचे तरी कसे, अशा गर्तेत सापडलेल्या गरजू कलावंतांसाठी काही सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या सहकार्याने सिनेसृष्टीतील ८० गरजू कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सिद्धी कामथ, पल्लविका पाटील व महेश्वर तेटांबे या तिघा कलावंतांनी याद्वारे आपुलकीचा हात पुढे केला. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे हे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कलावंत डॉ.विलास उजवणे यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे, दिग्दर्शक रामदास तांबे आदी मान्यवरांचा या उपक्रमाला पाठिंबा मिळाला.