आरोपींचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांच्या ताब्यात द्या;सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश
By रतींद्र नाईक | Published: December 5, 2023 06:23 PM2023-12-05T18:23:23+5:302023-12-05T18:23:45+5:30
पासपोर्ट मिळाल्यावर देश सोडून पळून जाणार नसल्याच्या हमीवर निर्देश
रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आरोपी हे भारतीय असून जप्त केलेले पासपोर्ट त्यांना परत करण्यास काहीच अडचण नाही शिवाय पासपोर्ट मिळाल्या नंतर आरोपी देश सोडून पळून जाणार नाहीत या हमीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून कुलाबा पोलिसांनी पिता पुत्रा विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपींचा पासपोर्ट २८ जुलै २०१९ रोजी जप्त केला. हा पासपोर्ट परत मिळावा यासाठी आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या समोर सुनावणी झाली. पोलिसांनी पासपोर्ट जप्त केला असला तरी तो पुरावा म्हणून ग्राह्य धरलेला नाही. तसेच पासपोर्ट मिळाल्यावर आपले अशील कोठेही पळून जाणार नाहीत अशी हमी आरोपींच्या वकिलांकडून देण्यात आली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना परत करण्याचे आदेश दिले.