डोंगरीतून टेलीफोन एक्स्चेंजचे रॅकेट चालविणाऱ्याला बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: July 26, 2023 08:40 PM2023-07-26T20:40:38+5:302023-07-26T20:40:55+5:30
एटीएसने या कारवाईमध्ये एकूण ५ लाख ७१ हजार १०० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबई : सिमबाॅक्सचा वापर करुन डोंगरीतील एका घरातून अवैधरीत्या चालणाऱ्या टेलीफोन एक्सचेंज रॅकेटचा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी केरळच्या रियास मोहम्मद पीके नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
डोंगरीत एक जण अवैधरित्या टेलीफोन एक्स्चेंज रॅकेट चालत असल्याची माहिती एटीएसच्या नागपाडा युनिटला मिळाली होती. त्यानुसार, एटीएसच्या पथकाने छापेमारी करुन रियासला ताब्यात घेतले. त्याच्या घर झडतीमध्ये पोटमाळ्यावरील एका खाचेमध्ये चार सिम बाॅक्स सापडले. एटीएसने या सिम बाॅक्सची तपासणी केली असता त्यात एअरटेल कंपनीची एकूण १४९ सिमकार्ड सापडली. एटीएसने या कारवाईमध्ये एकूण ५ लाख ७१ हजार १०० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
रियाज हा मूळचा केरळचा रहिवासी आहे. त्याने, डोंगरीमध्ये भाड्याने घर घेऊन तेथून हे रॅकेट चालवत होता. तो बांग्लादेशमध्ये राहणाऱ्या अलामल नावाच्या व्यक्तीच्या मदतीने हे एक्स्चेंज चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल रियास हा त्याच्याकडील उपकरणाव्दारे भारतातील इच्छुक मोबाईल क्रमांकावर अनधिकृतरित्या राऊट करत होता. त्यामुळे, भारत सरकारच्या टेलिकॉम खात्याची मोठ्याप्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. अखेर याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवत रियासला अटक करण्यात आली आहे. याचा पुढील तपास डोंगरी पोलीस करत आहे.