विकास निधीवर सत्ताधारी युतीची हातसफाई !
By admin | Published: March 30, 2016 02:02 AM2016-03-30T02:02:10+5:302016-03-30T02:02:10+5:30
महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना-भाजपा युतीने विकासाचा मोठा निधी आपल्याकडे वळविला आहे़ विकास निधीवर यंदाही युतीने अशी हातसफाई केल्यामुळे
मुंबई : महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना-भाजपा युतीने विकासाचा मोठा निधी आपल्याकडे वळविला आहे़ विकास निधीवर यंदाही युतीने अशी हातसफाई केल्यामुळे विरोधी पक्ष मात्र चांगलेच खवळले आहेत़ संतप्त विरोधकांनी पालिकेच्या महासभेत महापौर स्नेहल आंबेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले़ मात्र हा आरोप फेटाळून लावत निधीसाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे पत्रच आपल्याकडे आलेले नसल्याचा दावा महापौरांनी केल्यामुळे गोंधळ माजला़
सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या बाजूला पालिका सभागृहाने आज मंजुरी दिली़ ही मंजुरी देताना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठी रजा रोखीतून २३ कोटी रुपये आणि भूसंपादनातून २७ कोटी रुपये असे एकूण ५० कोटी रुपये प्रशासनाने वळविले आहेत़ यावर चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी महापौरांच्या निषेधार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली़ निधी वाटपात नेहमीच होणाऱ्या पक्षपाताबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना जाब विचारला़ महापौर हाय हाय, महापौरांचा निषेध असो, अशा घोषणा देण्यास विरोधकांनी सुरुवात केली़
विरोधी पक्षनेते छेडा यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगप्रकरणी सभागृहात निवेदन करण्याचा आग्रह धरला होता़ मात्र महापौरांनी यावर चर्चा करण्याची परवानगी नाकारल्याने सभागृहात गोंधळ सुरू झाला़ या गोंधळातच अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या बाजूला महापौरांनी मंजुरी देत असमान निधीवाटपाचा विषय गुंडाळला़ गेल्या वर्षीही महापौर निधीवाटपामुळे अडचणीत आल्या होत्या़ त्यामुळे आता महापौरांच्या या भूमिकेबद्दल चर्चेला उधाण आले आहे़ (प्रतिनिधी)
५० कोटी रुपये वळविले
अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या बाजूला पालिका सभागृहाने आज मंजुरी दिली़ ही मंजुरी देताना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठी रजा रोखीतून २३ कोटी रुपये आणि भूसंपादनातून २७ कोटी रुपये असे एकूण ५० कोटी रुपये प्रशासनाने वळविले आहेत़
निधीवाटपात यंदाही असमानता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या तोंडाला पाने पुसत विरोधकांची गोची केली आहे़ त्यामुळे विरोधी पक्ष निधी परत करणार असतील तर काँग्रेसचेही सर्व नगरसेवक निधी परत करीत सत्ताधाऱ्यांसोबत असहकार आंदोलन करतील.
- प्रवीण छेडा, विरोधी पक्षनेते
महापौरांचा बचाव विरोधकांनी केलेला टक्केवारीचा आरोप खोटा आहे. निधीवाटप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार झाले आहे.
- स्नेहल आंबेकर, महापौर