Join us  

रेल्वे मार्गात झोपडीदादांचा अडसर

By admin | Published: April 23, 2015 7:00 AM

६00 कोटी रुपये किमतीचा मुंबई सेंट्रल-बोरीवली पाचवा मार्ग वांद्रे ते खार दरम्यान असलेल्या स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. या ठिकाणी असलेली एक

सुशांत मोरे, मुंबई६00 कोटी रुपये किमतीचा मुंबई सेंट्रल-बोरीवली पाचवा मार्ग वांद्रे ते खार दरम्यान असलेल्या स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. या ठिकाणी असलेली एक पाऊलवाट तोडण्यास येथील झोपडपट्टीदादांनी विरोध केल्यामुळे ९९ टक्के पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचे काम या विरोधामुळे रखडले आहे. हे काम पूर्ण करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पश्चिम रेल्वेने राज्य सरकारकडे सुरक्षेची मागणी केली असून गेल्या अडीच महिन्यांपासून रेल्वेच्या या मागणीकडे दुर्लक्षच केले जात आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली या पाचव्या मार्गाचे काम काही वर्षांपूर्वी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) हाती घेण्यात आले आणि यातील मुंबई सेंट्रल ते माहीम टप्पा १९९३ साली, तर २00२ साली सांताक्रूझ ते बोरीवली टप्पा पूर्ण करण्यात आला. परंतु वांद्रे ते खार अशा दीड किलोमीटरच्या टप्प्यातील काम झोपडपट्टीवासीयांच्या विरोधामुळे रखडले आहे. येथे एक छोटीशी पाऊलवाट असून ती तोडून त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅक टाकला जाईल. तर रेल्वेकडून स्थानिकांसाठी पर्यायी व्यवस्थाही केली जाणार आहे. ही पाऊलवाट तोडण्यासाठी चार महिन्यांपूर्वी रेल्वेचे कर्मचारी, रेल्वे पोलीस गेले असता त्या ठिकाणी झोपडपट्टीवासीय आणि झोपडपट्टीदादांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. दोन वेळा ही पाऊलवाट तोडण्यासाठी गेल्यानंतर झोपडपट्टीवासीयांचा रोष पाहून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या लक्षात आले. त्यानंतर हे काम करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वेकडून राज्य शासनाकडे अडीच महिन्यांपूर्वी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र त्यावर अद्यापही शासनाकडून निर्णय न घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे काम अपूर्णच राहिल्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा ही अर्धवटच सुरू करण्यात आली आहे. सांताक्रूझ ते बोरीवली आणि मुंबई सेंट्रल ते माहीम अशा लांब पल्ल्याच्या ट्रेन धावतानाच त्यांना वांद्रे ते खार दरम्यान लोकलच्या ट्रॅकवरून धावावे लागते. यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेनला ट्रॅक बदलावा लागतो. यामुळे गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांना मोठा फटका बसत असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.