Join us

शिवशाही बसमध्ये दिव्यांगांनाही मिळणार सवलत; दिवाकर रावते यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 9:03 PM

एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही बसमध्ये दिव्यांग व्यक्तीस ७० टक्के तर त्यांच्यासोबत प्रवास करणा-या साथीदारास ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या वातानुकुलित शिवशाही बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. परंतु नंतरच्या काळात ज्येष्ठ नागरीक, पत्रकारांना शिवशाही बसमधून प्रवासासाठी भाडे सवलत देण्यात आली. याच धर्तीवर सवलत मिळावी, अशी मागणी अंध, अपंगांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली होती. या विनंतीचा सन्मान म्हणून अंध, अपंगांनाही शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.

सध्या महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असेही मंत्री रावते यांनी सांगितले.

टॅग्स :शिवशाहीमहाराष्ट्र