राज चिंचणकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कलाकारांच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करणारे हात, कलाकारांना सौंदर्य बहाल करतात; पण हेच हात जेव्हा सामाजिक संवेदनांची कास धरत रंगकाम करतात, तेव्हा त्यांना आगळे परिमाण प्राप्त होते. अशाच प्रकारचे कार्य रंगभूषाकार रवींद्र समेळ यांनी सध्या हाती घेतले असून, त्यातून समाजाला ते काही देऊ पाहत आहेत.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक जण विविध प्रकारे गरजूंना साहाय्य करण्यास पुढे येत आहेत. रवींद्र समेळ हेसुद्धा यात खारीचा वाटा उचलत आहेत. मात्र हे काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना बेड मिळवून देण्यापासून ते ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यापर्यंतची मदत ते अनेकांना करीत आहेत.
सध्याच्या स्थितीत योग्य ती माहिती योग्यवेळी न मिळाल्याने अनेकांना गोंधळाचा सामना करावा लागतो. अशावेळी रवींद्र समेळ हे स्वतःकडील माहिती आणि संसाधनांच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देत आहेत.
सिनेकर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही कोरोनाग्रस्त झाल्यास त्यांना योग्य वेळेत बेड मिळवून देणे आणि त्यांची आवश्यक ती सोय करणे याकडे ते लक्ष देत आहेत.
नाट्य रंगभूषाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या रवींद्र समेळ यांनी अनेक नाटकांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले आहे. सध्या मेकअप डिझायनर म्हणून मनोरंजन क्षेत्रात ते कार्यरत आहेत. हे सर्व सुरू असताना, त्यांनी आपल्या सामाजिक जाणिवा कायम जागृत ठेवल्या आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सिनेकामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी रवींद्र समेळ यांनी या कामगारांना अन्नधान्य पुरविले होते. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीत अनेकांना मनोबलाची गरज असते. त्यांच्यासाठीही रवींद्र समेळ कार्यरत आहेत.
* हे तर कर्तव्यच
आपल्या जवळच्या लोकांचे दुःख आपण जाणतो. आपल्या आवाक्यात आहे, तेवढे आपण करू शकतो. अशा वेळी मदतीचा हात पुढे करणे हे आपले कर्तव्य आहे. मी करत असलेली मदत म्हणजे समाजाने मला जे दिले आहे, त्याची एकाअर्थाने परतफेड आहे.
- रवींद्र समेळ (रंगभूषाकार)
--------------------------------------------------------------------------------