Join us

आगीशी झुंज देणाऱ्या जवानांचे हात बळकट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:07 AM

मुंबई : लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळ असलेल्या मुंबई अग्निशमन दलाला दररोज आगीशी झुंज द्यावी लागते. मुंबईत दरवर्षी सरासरी चार ...

मुंबई : लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळ असलेल्या मुंबई अग्निशमन दलाला दररोज आगीशी झुंज द्यावी लागते. मुंबईत दरवर्षी सरासरी चार हजारांहून अधिक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. यामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता उतरणारे जवानही अनेकवेळा जखमी होत असतात, तर चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते त्यांच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात. त्यामुळे जवानांचे हात बळकट करण्यासाठी फायर बाईक्स, ड्रॉन, फायर रोबोट्स आणि मिनी फायर स्टेशन्समध्ये जलद प्रतिसाद वाहने असा ताफा दाखल होणार आहे.

मुंबई अग्निशमन दलात तीन हजार कर्मचारी व अधिकारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईत शंभर अग्निशमन केंद्र असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबईत आगीच्या घटनेत वाढ झाली तरी अग्निशमन दलातील मनुष्यबळ वाढलेले नाही. नवीन भरती सध्या बंद असल्याने यंत्र चालकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. मात्र, कामगार संघटनांकडून विरोध होत असल्याने तूर्तास या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. परंतु, मनुष्यबळ अपुरे असल्याने जवानांवर कामाचा ताण अधिक आहे.

त्यामुळे अग्निशमन दल आधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार या वर्षभरात ६४ मीटर आणि वरील उंचीच्या शिड्या, २४ फायर बाईक्स, कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज, कांजुरमार्ग पश्चिम, जुहू तारा रोड - सांताक्रुज पश्चिम, माहुल रोड, चेंबूर आणि अंबोली अंधेरी पश्चिम येथे नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्यात येणार आहेत. यासाठी आगामी आर्थिक वर्षात १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर व आगीचे बंब वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी फायर बाईक्स तेथे पोहोचतील. व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार मदत मागू शकतात.

* देखरेख व मूल्यांकनासाठी फायर ड्रोनची खरेदी करण्यात येणार आहे.

* आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. अशा ठिकाणी रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग येथे थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे.

वर्ष.....आगीच्या घटना

२०१६-२०१७....४९०७

२०१७-२०१८...४८०५

२०१८-२०१९....५४२७

एकूण....१५१३९