Join us

500 किलो वजनाच्या इमानसोबत ह्रतिक करणार डान्स

By admin | Published: February 25, 2017 3:53 PM

इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदने अभिनेता ह्रतिक रोशनसोबत डान्स करण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25- बेरिएट्रिक सर्जरीसाठी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झालेल्या इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदने अभिनेता  ह्रतिक रोशनसोबत डान्स करण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा मी माझ्या पायांवर उभी राहिन तेव्हा ह्रितिकसोबत डान्स करायला आवडेल असं इमान अहमद बोलली आहे. 
 
ह्रतिक रोशनला जेव्हा इमानच्या इच्छेबद्दल कळले तेव्हा त्यानेदेखील यासाठी लगेच तयारी दर्शवली. 'इमानसोबत डान्स करायला मला आवडेल. भारतात परतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक असेन', असं ह्रतिक रोशनने म्हटलं आहे.
 
 
५०० किलो वजन असलेल्या इमानचे सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत ५० किलो वजन घटले आहे. ह्रतिक रोशनच्या आईने काही दिवसांपुर्वी इमानच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यांची बहिणदेखील इमानला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेल्या होत्या. 'इमानने लठ्ठपणाला दिलेला हा लढा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं', ह्रतिक बोलला आहे. 'एकदा त्यांच्यावरील उपचार पुर्ण झाले की मी नक्की त्यांचं डान्सचं आव्हान स्विकारेन. त्यांना भेटून मला खूप आनंद होईल', असं ह्रतिक बोलला आहे.
 
चर्नी रोड येथील रुग्णालयात इमानसाठी तयार करण्यासाठी विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये इमानवर उपचार सुरू आहेत. इमानला केवळ द्रवरूपी आहार सुरू असल्याने तिला असलेले विविध आजार नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते आहे. सध्या दिवसाला केवळ १,२०० कॅलरीचा आहार इमान घेते आहे. तसेच, दररोज ९० मिनिटांचे फिजीओथेरपीचे सेशन सुरू असल्याची माहिती फिजीओथेरपिस्ट डॉ. स्वाती संघवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
 
इमानने स्वत: हालचाल करावी यासाठी डॉक्टरांची चमू प्रयत्नशील आहे. त्यात तिने स्वत: हात हलविणे, हाच उचलणे, जास्त काळ हातात एखादी वस्तू पकडणे आणि मग आधाराने स्वत: उठून बसणे अशा विविध क्रियांवर टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन आठवड्यांत इमानवर पहिली सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इमानला तीन तासांहून अधिक काळ झोपण्याची परवानगी नाही, एकूण आठ तास ती झोप घेते. या वर्षात तिचे २०० किलो वजन घटविण्याचे लक्ष्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.