मुंबई : श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्या प्रकरणाने देश हादरला. श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी वेळीच श्रद्धाच्या तक्रारीची दखल घेतली असती तर ती आज जिवंत असती, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तिहार तुरुंगात आहे. या घटनाक्रमानंतर विकास वालकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत, वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलिस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले. सुरुवातीच्या काळात पोलिसांनी योग्य सहकार्य केले नाही. त्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी पोलिसांनी दखल घेतली असती, तर माझी मुलगी आज जिवंत असती. आफताबने माझ्या मुलीची जशी निर्घृण हत्या केली तशीच त्याला शिक्षा व्हावी. आफताबच्या कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले.
डेटिंग ॲपबद्दल विचार व्हावाघर सोडताना श्रद्धाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने ‘१८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे’, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे या स्वातंत्र्याबाबत आणि डेटिंग ॲपबाबतही विचार होणे गरजेचे आहे. डेटिंग ॲपमुळे आफताब माझ्या मुलीला भेटला होता, असेही ते म्हणाले.
२३ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तिच्या मित्राकडूनच श्रद्धाची माहिती घेत होतो. यादरम्यान श्रद्धासोबत काय होत होते, याची कल्पना नव्हती. श्रद्धाने तुळींज पोलिसांना तक्रार केली हेही मला माहीत नव्हते. २०२१ मध्ये श्रद्धाशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२१ रोजी माझे आफताबशी एकदाच बोलणे झाले होते. त्याच्याकडे मुलीबाबत चौकशी केली. मात्र, त्याने योग्य प्रतिसाद दिला नाही. तक्रार दाखल झाल्यावर तुळींज पोलिसांनी मला कुठलीच माहिती दिली नाही. याची चौकशी व्हायला हवी. - विकास वालकर