मुंबई : नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले नाही, अशा नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. या निर्णयाचा फटका इतर महापालिकांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेमधील पाच नगरसेवकांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या दोन व भाजपाच्या तीन अशा एकूण पाच नगरसेवकांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागणार आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या तीन, काँग्रेसच्या एक आणि समाजवादी पार्टीच्या एका नगरसेविकेला यंदाची दिवाळी पावणार असून, त्यांना पालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २५ आॅक्टोबर रोजी न्या़ बी. आर. गवई व न्या़ एन. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या पाच नगरसेवकांच्या विरोधातील याचिकांची सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेतील एकूण सात नगरसेवकांना या निर्णयाचा फटका बसला असता.
मुंबई महापालिकेतील पाच नगरसेवकांवर टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:40 AM