मुंबई : गिरणी कामगारांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांमुळे गिरणी कामगारांनी सोमवारी म्हाडा कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, त्यांच्या विविध प्रश्नांवर म्हाडा कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिह खुशवाह यांनी गिरणी कामगार कृती संघटना नेत्यांना सर्वच प्रश्नांवर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. यामुळे हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय संघटनेमार्फत घेण्यात आला.गिरणी कामगारांसाठी पनवेल कोन येथील घरांची २ डिसेंबर, २०१६ रोजी सोडत काढण्यात आली होती. मात्र, तीन वर्षे उलटूनही या विजेत्यांना घरांचे अद्याप वाटप झाले नाही, असे गिरणी कामगारांच्या वतीने या बैठकीमध्ये मांडण्यात आले. यावर १० जुलैपासून या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, तसेच सोडतीला विलंब का झाला, याची कारणे तपासून विजेत्यांना तातडीने घरे देण्याबाबत पारदर्शकता अवलंबली जाईल, असे खुशवाह म्हणाले.तसेच सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रस्तावावर प्राधिकृत अधिकारी आणि लेखा अधिकारी यांच्याकडून सात दिवसांच्या आत निर्णय घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीत सांगितले. बॉम्बे डाइंग आणि श्रीनिवासच्या मिळून ३,८०० आणि एमएमआरडीएच्या २,५०० अशा एकूण ६,३०० घरांची सोडत आॅगस्टपर्यंत काढली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. मात्र, या गिरण्यांची सोडतीची प्रक्रिया ओसी मिळाल्यानंतर हाती घ्यावी, असे कामगार नेत्यांनी सांगितले. कारण यापूर्वी ओसी न मिळता, सेंच्युरी, प्रकाश कॉटन, भारत टेक्स्टाइल अशा गिरण्यांतील कामगारांना घरे लागली, पण या घराचा ताबा घेताना सुमारे दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला. ही वस्तुस्थिती खुशवाह यांनी या वेळी मान्य केली. प्रथम बॉम्बे डाइंग, श्रीनिवास गिरण्यांतील कामगारांची, यानंतर थोड्या अवधीने एमएमआरडीएच्या घरांची सोडत काढण्याची कामगार नेत्यांची सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामगार नेत्यांच्या बैठकीत मान्य केली आहे. यामुळे सोमवारचा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय गिरणी कामगार नेत्यांनी घेतला. मात्र, याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई झाली, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असे कामगार कृती संघटनेने स्पष्ट केले. या वेळी जयश्री खाडिलकर, जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग, बजरंग चव्हाण, हेमंत गोसावी आदी कामगार नेते बैठकीला उपस्थित होते.
मागण्या मान्य झाल्याने गिरणी कामगारांचा मोर्चा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:16 AM