मुंबई : हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उडी घेतली असून, आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी आजच्या दिवशी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले.
या व्हिडीओमध्ये आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, "हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी... ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेली शनि, या शनिवारच्या दिवशी, मातोश्री आमचं ह्रदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. त्याठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे."
"महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. हनुमानाचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय."
"हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते, तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनि संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. पोलीस आम्हाला थांबवत आहे. शिवसैनिकांना दारासमोर उभं करून आमच्या विरोधात गुंडागर्दी, हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय."