VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:02 PM2022-04-25T14:02:44+5:302022-04-25T15:11:25+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान; ठाकरे सरकारवर खरमरीत टीका
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना तुरुंगात अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे. हनुमान चालिसा म्हणण्याला इतका विरोध कशासाठी, भारतात हनुमान चालिसा पठण करायची नाही, मग काय पाकिस्तानात म्हणायची का, असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असं राणा दाम्पत्यानं म्हटलं होतं. ते काय मातोश्रीवर हल्ला करणार होते का? नासधूस करणार होते का? कायदा हातात घेणार होते का? अशी प्रश्नांची सरबत्तीच फडणवीसांनी केली. राणा दाम्पत्यांना अडवण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली. त्या दोघांना अटक झाल्यावर जणू काही युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष केला, अशा शब्दांत फडणवीसांनी सेनेला टोला लगावला.
राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान देत देवेंद्र फडणवीस जेव्हा पत्रकार परिषदेतच 'हनुमान चालीसा' म्हणून दाखवतात... @Dev_Fadnavis#Devendrafadnavis#HanumanChalisa@BJP4Maharashtra@ShivSenapic.twitter.com/svU3YbrMQW
— Lokmat (@lokmat) April 25, 2022
हनुमान चालिसा मातोश्रीबाहेर पठण करू म्हणाले, तर राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. हनुमान चालिसा म्हटल्यानं जर राजद्रोह होत असेल, तर मग आमच्यातला प्रत्येक जण रोज राजद्रोह करेल, असा इशारा देत फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला. हनुमान चालिसा पठणानं राजद्रोह होत असेल, तर आम्ही दररोज राजद्रोह करण्यास तयार आहे. सरकारनं केसेस दाखल करून घ्याव्यात, असं म्हणत फडणवीसांनी पत्रकार परिषदेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली.
भाजपच्या नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला थेट लक्ष्य केलं. केरळ, पश्चिम बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते मारले गेले. मात्र तरीही आम्ही शांत बसलो नाही. हा तर महाराष्ट्र आहे. आम्ही गप्प बसू असं वाटेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंची मुदत दिली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित होते. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. गेल्या ४-५ दिवसांत घडलेल्या घटना, भाजप नेत्यांवरील हल्ले पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही, असं फडणवीस म्हणाले.